सातारा : मल्हारपेठ ते पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाच्या कामातील नियोजन शून्यतेमुळे मसूर येथील नागरिकांसह शेकडो वाहनधारकांची अक्षरशः दैना चालली आहे. उन्हाळ्यात सुस्त राहिलेल्या ठेकेदाराने आता पावसाचे थैमान सुरू असताना रस्ते खोदून ठेवल्याने गुडघाभर चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला येत आहे.
मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने शेकडो कोटींचा निधी दिला आहे. गेले काही महिने मायणीपासून मल्हारपेठजवळील निसरे फाट्यापर्यंतचे काम सुरू आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवल्यामुळे व कामे रेंगाळल्यामुळे या मार्गावरील गावांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी कराड तालुक्यातील मसूर या प्रमुख बाजारपेठेच्या गावाच्या दोन्ही बाजूचे काम आटोपण्यात आले. पंढरपूर बाजूकडून वाघेश्वरपर्यंत आणि उंब्रजकडून मसूरच्या दलित वस्तीजवळील ओढ्यावरील पुलापर्यंत काम पूर्ण झाले होते. त्याचवेळी लगेच गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेतले असते तर पाऊस सुरू होण्याआधी ते पूर्ण झाले असते. परंतु नियोजन शून्यतेमुळे त्यावेळी फारसे काही झाले नाही.
आता पावसाचे थैमान सुरू झाल्यानंतर हे काम करण्यासाठी कंत्राटदाराला जोर आला आहे. हा रस्ता ऐन पावसात खोदून ठेवल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यातील खड्डे पाण्याने भरले असून गुडघाभर चिखलातून वाहने चालवताना वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. या दलदलीतून पादचाऱ्यांना चालताही येत नाही. दुचाकी वाहनांना घसरण्याची भीती आहे. एवढे मोठे संकट संबंधित कंत्राटदाराने वाहनधारकांपुढे वाढून ठेवले आहे. वाहनधारकांची इतकी दैना सुरू असताना प्रशासन काहीच ॲक्शन घेत नसल्यामुळे कंत्राटदार कुणाला जुमानत नाही असे चित्र तयार झाले आहे.
दर्जाविषयी पहिल्या दिवसापासूनच प्रश्नचिन्ह
वास्तविक, या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत पहिल्या दिवसापासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याला लेव्हल नाही, अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, काँक्रीट टाकल्यानंतर त्यावर व्यवस्थित पाणी मारले गेले नाही, क्युरींगपर्यंत त्यावरून वाहने जाऊ नयेत याची काळजी न घेतल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकोऱ्या तयार झाल्या आहेत. त्यातून दुचाकीस्वारांना वाहन चालवताना नियंत्रण सुटण्याचा धोका आहे. अशा विविध तक्रारी मसूर व मसूर परिसरातील जागरूक नागरिकांसह असंख्य वाहनधारकांनी वारंवार करून देखील त्याची दखल घेतली गेलेली नाही. याचा अर्थ कंत्राटदार व बांधकाम विभाग यांचे साटेलोटे आहे का ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.