सभासद-शेतकऱ्यांच्या सहकार्याने 'अजिंक्यतारा' प्रगतीपथावर ; ना. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा केला शुभारंभ

by Team Satara Today | published on : 27 October 2025


सातारा  : अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या उभारणीत सभासद शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही संस्था स्वयंपूर्ण झाली असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देत आहे. उद्या तुम्ही-आम्ही नसलो तरी, सातारा तालुक्याच्या आर्थिक वैभवात भर घालणारी ही संस्था कायम असणार आहे. त्यामुळे ही आपली संस्था आणखी मोठी झाली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांना आणखी चांगला दर देता आला पाहिजे, यासाठी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वानीच सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व अन्य मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती वनिता गोरे, किरण साबळे पाटील, राजू भोसले, सतीश चव्हाण, विक्रम पवार, कांचन साळुंखे, सुरेश सावंत, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, मिलिंद कदम आदी उपस्थित होते. 

ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आगामी गळीत हंगामात ८ लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. आपण ज्या वेळी एखादे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळी पुढे द्यावयाचा ऊसदर, कामगारांचा बोनस, कर्ज, व्याज आदी बाबींचा विचार केलेला असतो. इच्छित उद्धिष्ट आपण पूर्ण नाही केले तर मग शेतकऱ्यांना उच्चतम दर देणे यासह सर्वच बाबींवर परिणाम होतो. आपला कारखाना उसाला उच्चतम दर देतानाच १० दिवसांत पेमेंट, कामगारांना बोनस देतो, या बाबींचा विचार करून आपल्या हक्काचा हा कारखाना अधिक क्षमतेने चालला पाहिजे, अशी भावना सभासद, शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. जेवढे जास्त गाळप, जेवढी जास्त रिकव्हरी, तेवढे साखर व उपपदार्थांचे उत्पादन वाढेल आणि त्याच प्रमाणात जास्तीत जास्त ऊसदर देता येईल, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, 

जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत आपण कुठंही मागे नाही, उलट ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आपण काकणभर जास्तच देत आहोत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. शेतकऱ्यांची कसलीही अडवणूक, पिळवणूक होऊ नये याची खबरदारी शेती विभागाने घ्यावी. ही संस्था सभासद, शेतकरी, कामगार यांची आहे. त्यामुळे कारखाना अधिक जोमाने चालला पाहिजे यासाठी या दोन्ही घटकांनी आपला तसेच शेजारी पाजारी, पै पाहुणे यासह गावातील संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्यात गाळपासाठी आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा आणि हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. 

जेष्ठ सभासद लालासाहेब पवार यांनी कारखाना शेतकऱ्यांना उच्चतम दर देत असल्याचे सांगून ना. शिवेंद्रसिंहराजे व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. व्हा. चेअरमन सावंत यांनी प्रास्ताविक केले. संचालक विश्वास शेडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुका संघाचे सुनील काटे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, सुरेश टिळेकर, गणपत मोहिते, गणपत शिंदे, मधुकर पवार, आनंदराव कणसे, विजय पोतेकर, पदमसिंह फडतरे, युनियन अध्यक्ष दिलीप शेडगे यांच्यासह सर्व आजी माजी संचालक, सभासद, शेतकरी आणि कामगार कर्मचारी उपस्थित होते. 

कामगारांना १० टक्के वेतनवाढ 

दरम्यान, राज्यस्तरीय कराराप्रमाणे कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांना १० टक्के प्रमाणे सुधारित वेतन वाढ लागू केली आहे. एप्रिल २०२४ पासून वेतनवाढ लागू केली असून तेव्हापासून होणाऱ्या फरकाची रक्कम संबंधित कामगार- कमर्चाऱ्यांना अदा करण्यासही सुरुवात झाली आहे. फरकाची रक्कम अदा करणारा अजिंक्यतारा कारखाना हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे. याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे व संचालक मंडळाचे कामगार युनियनच्या वतीने आभार मानून अभिनंदन करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संविधान संघर्ष समितीचे सातार्‍यात आंदोलन; जिल्ह्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध, जोरदार घोषणाबाजी
पुढील बातमी
सातारा-लोणंद-शिरवळ रस्ता रुंदीकरणाची कामे दर्जेदार करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

संबंधित बातम्या