तारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बाल दिंडी सोहळा उत्साहात; संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले

by Team Satara Today | published on : 25 July 2026


तारगाव : कोरेगाव तालुक्यातील तारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून, टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि भक्तिमय अभंगांच्या स्वरांत गावातून दिंडी काढली. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी, विद्यार्थ्यांचे पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव तसेच शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे उत्साहाने कौतुक करत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

दिंडीदरम्यान महिलांनी व पालकांनी जोडीने फुगड्या खेळून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. विशेष म्हणजे पत्रकार संदीप मोरे आणि उपसरपंच लक्ष्मण (तात्या) निकम यांनी खेळलेली फुगडी उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाची संपूर्ण गावात चर्चा रंगली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

दिंडी सोहळ्यानंतर शाळेमध्ये गुरुपाद्यपूजन हा संस्कारमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता, आदर आणि संस्कारांची जपणूक केली. या भावनिक क्षणांनी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. भारतीय संस्कृतीतील "मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव" या मूल्यांचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री. सचिन क्षीरसागर गुरुजी यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने केले. त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक करत श्री. सचिन क्षीरसागर  गुरुजी तसेच सर्व शिक्षकवर्गाचे आभार मानले.

अशा प्रकारचे सांस्कृतिक व संस्कारक्षम उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारगाव ही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कार, परंपरा आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करणारी आदर्श शाळा असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील ईश्वरपूरच्या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; खेड फाटा येथे तोल जाऊन पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत
पुढील बातमी
‘विठूरायाच्या’ गजराने अख्खी दुमदुमली प्रतिपंढरपूर करहरनगरी; ह.भ.प. कळंबे महाराजांनी सुरु केलेल्या या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे फिटले पारणे

संबंधित बातम्या