सातारा : सातारा पालिकेत विजयी झालेल्या उदयनराजे गटाच्या नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी पुणे येथे कोरेगाव पार्क मधील निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीमध्ये साताऱ्याच्या विकासाचा अजेंडा राबवूया तसेच नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना दिले. आगामी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीच्या संदर्भातही त्यांनी राजकीय कानोसा घेतला.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या. या बैठकीत सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात राबवायच्या योजना, प्राधान्यक्रम आणि आवश्यक समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकास प्रक्रियेत लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे असून, त्याच उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सातारा शहराच्या हितासाठी आमच्यावर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवारांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. विकास हाच एकमेव अजेंडा ठेवून सातारा शहराला पुढील टप्प्यावर नेण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी केला. या बैठकीदरम्यान सातारा शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याची ग्वाही खासदार उदयनराजे यांनी दिली. लोकप्रतिनिधींची ही एकजूट सातारा शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
निशांत पाटील उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक
या बैठकीमध्ये सातारा विकास आघाडीचे पक्षप्रदूत निशांत पाटील आपणच उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहोत आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे असे थेट भूमिका मांडली .यंदाची माझी पाचवी टर्म आहे तसेच सातारा विकास आघाडीच्या सर्व सभासदांना एकत्र घेऊन काम करणे आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याशी उत्तम समन्वय राखणेया सर्व जबाबदाऱ्या मी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो असे ते म्हणाले. मी नगरपालिकेत उपलब्ध नसतो अशा विविध स्वरूपाच्या चर्चा आपल्या कानापर्यंत आले असतील पण त्यावेळी काही घरगुती अडचणी होत्या. आता मात्र मी त्या जबाबदारीतून मोकळा झालो असून पूर्ण वेळ साताऱ्याला वेळ देण्यासाठी उपलब्ध आहे. साताऱ्याच्या विकासासाठी मी माझ्या पद्धतीने आघाडीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे निश्चित काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.