गुजरातमधील राजकोटमध्ये इमारतीला भीषण आग

३ जणांचा मृत्यू, ३० जण अडकले

by Team Satara Today | published on : 14 March 2025


राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये आज होळीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका उंच इमारतीला भीषण आग लागली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३० लोक अडकले आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील १५० फूट रिंग रोडवरील एटलांटिस बिल्डिंगमध्ये ही आगीची घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली, ज्यामुळे ३० हून अधिक लोक आत अडकले. यामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण भाजल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आगीची माहिती लोकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग वेगाने पसरली, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील लोकांना बाहेर निघायला वेळच मिळाला नाही. मदत कार्यादरम्यान क्रेन आणि पायऱ्यांच्या मदतीने लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

आग लागल्यानंतर सर्वत्र धूर पसरला, ज्यामुळे लोक इमारतीत अडकले, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. अनेक लोकांनी खिडक्या आणि बाल्कनीतून मदतीसाठी याचना केली. घटनेची माहिती मिळताच राजकोटचे एसीपी बीजे चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या कार्यरत आहेत. याच दरम्यान, भाजपा नेत्या दर्शिता शाह म्हणाल्या की, प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे आणि जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजितदादांची पुन्हा फलटणशी सोयरिक
पुढील बातमी
काशिनाथाच्या नावानं चांगभलं च्या गजरात बावधनचे शेकडो ग्रामस्थ जलमंदिरावर

संबंधित बातम्या