मनोमिलनाच्या चर्चेचा चेंडू शिवेंद्रसिंहराजे यांच्या कोर्टात

कास तलावाच्या ओटी भरण कार्यक्रमानंतर खासदार उदयनराजे यांची टोलेबाजी

by Team Satara Today | published on : 18 July 2025


सातारा : सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजांचे मनोमिलन, की मैत्रीपूर्ण लढती? या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे राजकीय टोलेबाजी केली. माझे मन सरळ आहे. मी स्थानिक पातळीवर राजकारण करत नाही. पुढचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी घ्यावा, असे स्पष्ट करत उदयनराजे यांनी मनोमिलनाच्या चर्चेचा चेंडू शिवेंद्रसिंहराजे यांच्या कोर्टात टोलवला आहे. आम्ही चर्चा करणार आहोत. मात्र ते कॅबिनेट मंत्री असून सध्या बिझी आहेत, अशी मिश्किली सुद्धा त्यांनी केली. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत कास तलावाच्या ओटी भरणाचा कार्यक्रम दोन वर्षाच्या कालखंडानंतर पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष रंजना रावत, सुजाता राजेमहाडिक, शिवानी कळसकर, माजी सभापती अनिता घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, राम हादगे, राजू भोसले, सागर पावशे, पंकज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, माजी नगरसेवक वसंत लेवे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे, संदीप सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

ओटी भरण कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांनी उदयनराजे यांना आगामी नगरपालिका निवडणुका आणि त्याचे राजकीय समीकरण या मुद्द्यावर छेडले असता ते म्हणाले, मी स्थानिक पातळीवर कधीही राजकारण करत नाही. आजपर्यंत मी नेहमी समाजकारण केले. कोणालाही बाजूला सरकवण्याचा मी कार्यक्रम केला नाही. कारण राजकारण करायला अक्कल लागत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या बिझी आहेत. पक्ष चिन्ह की आघाडी याबाबतचा निर्णय आम्ही चर्चा करून घेऊ. हा निर्णय मी हा एकटा घेऊ शकत नाही. मनोमिलनाच्या संदर्भातही ते म्हणाले, माझे मन सरळ आहे. आता यापुढील निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी घ्यावा. ही चर्चा केव्हा होणार, या प्रश्नावर ते म्हणाले की चर्चा होईल. पण सध्या शिवेंद्रसिंहराजे बिझी आहेत. योग्य वेळी काय ते चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेच्या आवारात आमदार गोपीनाथ पडळकर व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत जोरदार मारामारी झाली, या प्रश्नावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आपण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांना आपल्याकडून अपेक्षा असतात. आपल्याकडून विकास कामे तसेच आपले सामाजिक जीवनातील वर्तन याविषयी लोकांचा विरस झाला तर आपल्या प्रतिनिधीत्वाला अर्थ उरत नाहीत. विधानसभेच्या आवारात अशा प्रकारचे वर्तन आमदारांनी करू नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मतभेदांमध्ये वादावादी होऊ शकते. मात्र त्या चर्चेचे स्वरूप मारामारी पर्यंत जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, गडकोट किल्ल्याचे पावित्र्य आणि तेथील ऐतिहासिक संदर्भ जपणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे अन्यथा गडकोट किल्ल्यांचे आणि वारसा स्थळांचे विद्रूपीकरण करणे अशाच प्रवृत्ती वाढत आहेत. वारसा स्थळांची प्रक्रिया ही अत्यंत वेळखाऊ असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. महाराष्ट्रातील नागरिकांची आता जबाबदारी वाढलेली आहे. त्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी तसेच राज्य शासनाने समन्वयाने या वारसा स्थळांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. तसेच कास धरण प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा आम्हाला अभिमान आहे. सातारकरांच्या आगामी भविष्यातील पाण्याचा प्रश्न पाहून आम्ही या धरणाची उंची वाढवली. सातारा शहरासह 16 गावांचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच कास तलावात काही ठिकाणी छोटी-छोटी बेटे आहेत. या बेटांजवळ काही बंधारे घालून तेथेही पाणी अडवता येते का, याची आम्ही माहिती घेत आहोत. याशिवाय कास पठारावर काही साहसी क्रीडा प्रकार विकसित व्हावेत याबाबतचा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. त्याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. कास धरण परिसर आणि येथील निसर्ग, तेथील पर्यावरण हे जपणं हे सातारकरांचे कर्तव्य आहे. या पर्यावरणाला कचरा टाकून कलंक लावू नये. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविकांनी कास तलावाला साडी अर्पण करून मनोभावे नमस्कार केला. मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून वर्षभर सातार्‍याला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावाची मनोभावे पूजा करण्यात आली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजंठा चौकात उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याची अफवा
पुढील बातमी
मनोज शेंडे मित्रसमुहाचा उपक्रम स्तुत्य

संबंधित बातम्या