साताऱ्यातील वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड, धमकीप्रकरणी दोघांना अटक

मुख्य आरोपीचा मेहुणा व सहकारी मुंबईतून अटकेत; पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 30 June 2025


सातारा : साताऱ्यातील नामवंत साप्ताहिक भूमिशिल्प या वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या नितीन जाधवसोबत आता त्याचा मेहुणा नितीन गायकवाड व दिलावर शेख या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एकूण तिघे पोलिसांच्या ताब्यात असून, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साताऱ्यातील पत्रकार संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १३ जून रोजी पोवई नाका येथील बालाजी प्रेस्टीज चेंबर्स इमारतीत असलेल्या भूमिशिल्प वृत्तपत्राच्या कार्यालयात गाळामालक नितीन बजरंग जाधव, त्याची पत्नी आणि अनोळखी दोन ते तीन व्यक्तींनी अनधिकृतपणे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर २० जून रोजी कार्यालयात घुसून संगणक, सीसीटीव्ही, महत्त्वाची कागदपत्रं, फर्निचर यांची तोडफोड करण्यात आली. टेबलमध्ये ठेवलेली पाच हजार रुपयांची रोकडही लंपास करण्यात आली. एकूण पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे संपादक पद्माकर चंद्रकांत सोळवंडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर २५ जून रोजी दुपारी १२.०५ वाजता श्री. सोळवंडे यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण लागले. चौकशीत नितीन जाधव याचा मेहुणा नितीन गायकवाड (मूळ गाव रा. रायगाव, ता. जावली , सध्या रा. मुंबई) आणि त्याचा सहकारी दिलावर शेख (रा. मुंबई)यांनी धमकी दिल्याचे स्पष्ट झाले.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पत्रकार संघटना सक्रिय झाल्या. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, सातारा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि इतर प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मुंबईत धाड टाकून नितीन गायकवाड आणि दिलावर शेख यांना ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हालचाल केल्याने पत्रकारांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, हल्ल्यात सहभागी असलेल्या नितीन जाधवच्या पत्नीसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींनाही तातडीने अटक करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणाचा तपास हवालदार महेश देशमुख करत असून, आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दाम्पत्याच्या घरी चोरी
पुढील बातमी
वृद्धेला लाखाचा गंडा

संबंधित बातम्या