जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीतच राजकीय कसोटी; अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

उदयसिंह उंडाळकर, अतुल भोसले यांच्या नावांची चर्चा, अंतिम निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

by Team Satara Today | published on : 17 November 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकत्रितपणे ताकद दाखविणाऱ्या महायुतीसमोर आता सत्तेतील वाट्याचा पेच उभा राहिला आहे. संचालक मंडळात संख्याबळ मिळविल्यानंतर अध्यक्षपद कोणाकडे द्यायचे, यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत चाचपणी सुरू झाली आहे. निवडीची तारीख जवळ आली असतानाही नेतृत्वाच्या पातळीवर एकमताची घोषणा झालेली नसल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार असे महायुतीचे संख्याबळ आहे. त्यामुळे बँकेवरील सत्ता महायुतीकडे जाणे निश्चित मानले जात असले, तरी अध्यक्षपदाच्या वाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतांची जुळवाजुळव सुरू आहे. निवडणुकीत एकत्र राहिलेल्या पक्षांना आता सत्तेचे सूत्रही एकमताने ठरवावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयसिंह उंडाळकर यांच्या नावाला पसंती मिळावी, यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचा राजकीय वारसा आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता राष्ट्रवादी या नावासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भाजपच्या गोटातून अतुल भोसले यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे. संचालकांच्या संख्याबळाचा आधार घेत भाजप अध्यक्षपदावर आपला दावा सोडण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे राजकीय चित्र आहे.
या सत्तासमीकरणात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास अध्यक्षपदाच्या निवडीत वेगळे गणित तयार होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि नेते कोणाच्या बाजूने उभे राहतात, यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. उपाध्यक्षपदासाठी ज्ञानदेव रांजणे यांच्या नावाची चर्चा असल्याने अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची विभागणी कशी होते, याकडेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवरील चर्चेतून घ्यायचा की थेट राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप करायचा, यावरही मतभिन्नता असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर अंतिम निर्णय व्हावा, अशी भूमिका भाजपमधील काही नेत्यांकडून मांडली जात असल्याची चर्चा आहे. तर जिल्ह्यातील नेत्यांनीच परस्पर सामंजस्यातून तोडगा काढावा, असा दुसरा मतप्रवाह आहे. अडीच-अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या पर्यायावरही अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
बँकेच्या निवडीपेक्षा सत्तावाटपाचीच चर्चा अधिक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने दाखविलेली एकजूट आता अध्यक्षपदाच्या निर्णयावर टिकून राहते का, हा खरा प्रश्न आहे. एका पदासाठी दोन प्रमुख पक्षांचे दावे असल्याने वरिष्ठ नेत्यांना समतोल साधताना कसरत करावी लागणार आहे. बुधवारी होणारी निवड केवळ अध्यक्ष निवडीपुरती मर्यादित राहणार नसून जिल्ह्यातील महायुतीच्या भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशाही ठरविणारी ठरणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घाला - उमेश चव्हाण, दलित महासंघातर्फेउपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांना निवेदन
पुढील बातमी
ऊसदराच्या चर्चेत तोडगा; जिल्ह्यातील कारखान्यांकडून ३९०० रुपये देण्याची तयारी; बैठकीत दराबाबत सहमती

संबंधित बातम्या