अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू

by Team Satara Today | published on : 05 October 2024


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील भायखळा तालुकाध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला झाला.पोलिसांचे पथक सध्या घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा येथील तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काल रात्री 12.30 च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये कुर्मी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. म्हाडा कॉलनी परिसरात त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सचिन कुर्मी हे तेथे जखमी अवस्थेत सापडले. त्यांना पोलिसांच्याच गाडीतून जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे.

हा हल्ला नेमका कोणी केला, का केला, हल्ल्यामागचे कारण काय, कुर्मी यांचा कोणाशी वाद वा शत्रुत्व होतं का, या सर्व अँगलनी पोलिसांकडून या हत्याकांडाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा
पुढील बातमी
मुंबईकरांना आता शहराच्या उदरातून करता येणार सुसाट प्रवास

संबंधित बातम्या