वाई : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव ता. वाई येथील श्री काळुबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक देवराई सध्या गंभीर धोक्यात आली असल्याची चिंता भाविक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या अनियंत्रित उत्खननामुळे देवराईचे अस्तित्व धोक्यात आले असून डोंगराची माती व दगड अनेक ठिकाणी कोसळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्री काळुबाई देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मांढरदेव येथे येतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराकडे जाणारा आणि परत येण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध आहे. मात्र Y जंक्शनकडून येणाऱ्या परतीच्या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्याने परिसरातील डोंगराची स्थिरता धोक्यात आली आहे. त्यामुळे देवराईचे नैसर्गिक संरक्षण कमी होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टच्या मालकीच्या जागेत कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याने काही व्यक्तींनी अनधिकृतपणे दुकाने उभारण्यासाठी डोंगर पोखरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगड घसरत असून देवराईचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या परिसरात होत असलेल्या बदलांमुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित विश्वस्त मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ व भाविकांकडून केला जात आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास पुढील काही वर्षांत देवराईचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.
मांढरदेवची देवराई ही केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे संबंधित विश्वस्त मंडळ,वन विभाग, महसूल खाते आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून अनधिकृत उत्खननाला आळा घालावा, देवराईचे संरक्षण करावे आणि डोंगराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी भाविक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.