पुणे : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केली. पवार यांनी गायकवाड यांच्या अटकेची मागणी करून कोथरूड पोलीस ठाण्यात शुक्रवारी आंदाेलन केले.
‘कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुुटुंबीयांना गायकवाड यांनी शिवीगाळ केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली’, असा आरोप रोहित पवार यांनी केला. ‘तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून दखल घेण्यात आली नाही. संतोष पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली जाते. मात्र, शिवीगाळ, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर गायकवाड यांना अटक होत नाही,’ असे पवार यांनी सांगितले.
‘पोलीस तक्रार घेण्यास चालढकल करत आहेत. पूर्वी पोलीस ठाण्यात ‘प्रथम नागरिक’ अशी संकल्पना होती. आता पहिले ‘सत्ताधारी’ अशी संकल्पना आहे. सताधाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यास कारवाई केली जाते. मात्र, सत्ताधाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येते,’ असे पवार यांनी नमूद केले.
‘गायकवाड यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दिली होती. गायकवाड यांना त्वरित अटक करावी,’ अशी मागणी आंबी यांच्या पत्नीने केली. याबाबत सोनाली त्रिंबक कांबळे यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणे उचित नाही. या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, असे कांबळे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
पोलिसांची भूमिका
‘प्रशांत आंबी प्रकरणात कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या प्रकरणात पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करता येणार नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,’ असे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांचे कोथरूडमध्ये आंदोलन; आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा