सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या तेरा गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश निर्गमित केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळीप्रमुख रोहित भीमराव जाधव, टोळी सदस्य राहुल भीमराव जाधव, गौरव बाळासो भंडलकर, ऋतिक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो भंडलकर सर्व रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा यांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी मारामारी करणे, दुखापत करून शिवीगाळ दमदाटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात टोळीप्रमुख छगन मोहन मदने, सदस्य चेतन शंकर लांडगे, साजन नानासो चव्हाण (तिघे रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा), दीपक दत्तात्रय धायगुडे, आदेश सुखदेव जाधव, सुरज शिवाजी बोडरे, निलेश सुनील जाधव, विक्रम उर्फ आप्पा लालासो जाधव सर्व रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा यांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या परस्परविरोधी उपद्रवी टोळ्यांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील महाडिक यांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती.
हे सर्वजण फलटण तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाया चालू ठेवत असल्याने त्यांच्यावर वेळोवेळी फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हद्दपार टोळ्यांतील संबंधितांवर दाखल गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यांना कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळ्यांचा उपद्रव होत होता. अशा टोळ्यांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या टोळ्यांना संपूर्ण सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपरीचा आदेश पारित केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून म. पो. का. क. 55 प्रमाणे 37 टोळ्यांमधील 128 जणांना, म. पो. का. क. 56 प्रमाणे 38 जणांना, म. पो. का. क. 56 प्रमाणे 4 जणांना अशा एकूण 170 जणांवर तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून आगामी काळात सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी यांनी योग्य पुरावा सादर केला.