मिसाळवस्ती (ता. माण) येथे एका शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी

by Team Satara Today | published on : 06 May 2026


माण : मिसाळवस्ती (ता. माण) येथे एका शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. सोमवारी (दि. 4) मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी झाले असून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरणेवाडी येथील मिसाळवस्तीवरील शेतकरी प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी सुला हे शेतातील घरात झोपले असताना, तोंडाला रुमाल, अंगात रेनकोट व टोपी घातलेल्या सुमारे 20 ते 25 वयोगटातील 8 सशस्त्र दरोडेखोरांनी घरात घुसून हल्ला चढवला. घरात प्रवेश करताच त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत दाम्पत्याला बेदम मारहाण केली. आरडाओरडा केल्यामुळे संतप्त दरोडेखोरांनी सुला यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली, तर प्रल्हाद यांच्यावर चाकूने वार करून इलेक्ट्रॉनिक पिस्तूलद्वारे करंट देण्याचा प्रयत्न केला. तसेच मारून टाकू अशा धमक्या देत दरोडेखोरांनी घरात दहशत माजवली.

यानंतर त्यांनी घरातील देवघर फोडून कपाटातील सुमारे 3 तोळे सोने, मंगळसूत्र, बाळ्या, चांदीचे कडे, अंगठी तसेच रोख रक्कम असा अंदाजे 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. संदीप पोमण, कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे व जगन्नाथ लुबाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारू पिण्यासाठी शंभर रूपये न दिल्याने अनोळखी व्यक्तीने मजुरास चाकूने भोसकले; आगाशिवनगर येथील घटना

संबंधित बातम्या