नव्या वर्षाच्या प्रारंभीच लाडक्या बहिणींच्या जखमेवर चोळले मीठ ; दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास प्रारंभ ; महिलांमध्ये तीव्र असंतोष

by Team Satara Today | published on : 01 January 2026


 सातारा : जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शासनाने नव्या वर्षाच्या प्रारंभीच लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ चोळले असून दि. ३१ डिसेंबर पासून त्यांच्या खात्यावर केवळ दीड हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे.  या कृतीमुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड नव्हे तर कडू होणार असल्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

लाडक्या बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ अशा दोन महिन्यांचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नव्हता. नोव्हेंबर डिसेंबर आणि नवीन वर्षातील जानेवारी महिन्यासह ४५०० रुपये रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करून त्यांची संक्रात शासन गोड करेल अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिली होती. मात्र त्यांच्या अपेक्षा अपेक्षाच राहिल्या असून काल दि. ३१ डिसेंबरपासून पात्र आणि लाभार्थी महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्याच खातात दीड हजार रुपये जमा झाले असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना केव्हा मिळतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

नवीन वर्षामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होतील, अशी आशा होती मात्र ती अशा पूर्ण मावळल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून आता गोड संक्रात करायची कशी असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 

असे होईल वाटलेही नव्हते 

राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या घोषणा कोणत्याही क्षणी होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते. सातारा जिल्ह्यापुरतेच बोलायचे झाल्यास नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळेच जिल्ह्यामध्ये निवडणूक निकालामध्ये भाजप अव्वल पक्ष ठरला. हप्ता जमा झाला नाही तरी लाडक्या बहिणींनी आपली भूमिका चोख पार पाडली. मात्र शासनाने केवळ दीड हजार रुपये जमा करून त्यांच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे असे होईल वाटलेही नव्हते अशा प्रतिक्रिया त्यांच्यामधून व्यक्त होत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नववर्षाच्या पहाटेच काळाचा घाला ! कोल्हापुरात भरधाव कारने तिघा जणांना चिरडले
पुढील बातमी
ही दोस्ती तुटायची नाही.... ! खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली राजेंद्रसिंह यादव यांची गळाभेट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

संबंधित बातम्या