सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक परिणामकारकता आणि समन्वय साधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने अंतर्गत बदलीचा मोठा आदेश जारी केला आहे. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 22(2) अंतर्गत एकूण 41 अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली असून, या फेरबदलामुळे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.
पोलीस निरीक्षक पदावरील बदल्यांमध्ये महेंद्र जगताप यांच्याकडे खंडाळा, धनश्याम बल्लाळ यांच्याकडे फलटण शहर, अरुण देवकर यांच्याकडे कोरेगाव, प्रदीप सूर्यवंशी यांच्याकडे वाई, शितलकुमार कोल्हाळ यांच्याकडे कराड तालुका, महेश इंगळे यांच्याकडे शिरवळ आणि हर्षद गालिंदे यांच्याकडे महाबळेश्वर पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. बापूसाहेब सांडभोर यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्तरावरही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. राजेश माने यांच्याकडे सातारा शहर वाहतूक शाखा, अभिजित यादव यांची स्थानिक गुन्हे शाखा, अभिजित चौधरी यांची कराड शहर, प्रकाश भुजबळ यांची कराड तालुका, निलेश तारू यांची पाटण, राजेश माळी यांची सायबर पोलीस ठाणे, रघुनाथ शिंदे यांची कोरेगाव, चंद्रहार पाटील यांची सातारा तालुका, भाऊसाहेब गोसावी यांची दहिवडी, संदीप साळुंखे यांची कराड शहर वाहतूक शाखा, प्रदीप जाधव यांची वाई, संदीप गोसावी यांची सातारा शहर आणि सुनील जानकर यांची औंध पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय काही पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली असून, काही अधिकार्यांना विद्यमान पदस्थापनेवर मुदतवाढ देण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने नव्या पदस्थापनेवर रुजू होऊन त्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.