अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत समिती सदस्यपदी वसंत जोशी, जे.पी. शिंदे यांची नियुक्ती

by Team Satara Today | published on : 08 September 2025


सातारा : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरु आहे. या संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी हॉटेल चंद्रविलास उद्योग समूहाचे प्रमुख वसंत जोशी  आणि सहकार खात्यातील कर्तबगार अधिकारी जनार्दन शिंदे ऊर्फ जेपी शिंदे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सहीने देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यविश्वातील सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक, कवी, समीक्षक, लेखक, साहित्यप्रेमी आणि मराठी संस्कृतीचे जतन करणारे मान्यवर एकत्र येतात. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या समितीत स्थान मिळणे ही प्रतिष्ठेची बाब असून मराठी साहित्यसेवेचा सन्मान मानला जातो. साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या संमेलनाची तयारी, नियोजन सुरु असून स्वागत समितीमध्ये विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात येत आहे.

वसंत जोशी हे साताऱ्यातील सुप्रसिद्ध हॉटेल चंद्रविलास या उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. साताऱ्यासह पुणे, कोरेगाव व नुकतेच सांगली येथे हॉटेल चंद्र विलासच्या माध्यमातून खवैय्यांना चविष्ट, सात्विक व शुध्द अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही त्यांची खासियत आहे. श्री. जोशी यांना सामाजिक कार्याची विशेष आवड असून ते सातारा शहरात विविध सामाजिक कार्यांमध्ये हिरारीने पुढाकार घेत असतात. तर जनार्दन शिंदे  सहकार खात्यातील अतिशय कर्तबगार अधिकारी असून ते  जे.पी.या नावाने परिचित आहेत. श्री. शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील बऱ्याच सहकारी संस्था विशेषत: बँका व पतसंस्था या अडचणीत असताना त्यांना सहकार खात्याच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करून अडचणीतून बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केलेले आहे. सातारा जिल्ह्याबरोबरच त्यांनी इतर जिल्ह्यातही याच पध्दतीने कामकाज करून एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. साताऱ्यात होणारे साहित्य संमेलन हे वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि संयोजन समिती प्रयत्नशील असून त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार

वसंत जोशी आणि जे.पी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल दोघांनीही आनंद व्यक्त केला असून संमेलनाच्या नियोजात देईल ते काम, जबाबदारी योग्यरितीने पार पाडण्याची ग्वाही दिली आहे. या दोघांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उदयनराजे-कपिल देव भेटीत 1983 च्या वर्ल्ड कपला उजाळा
पुढील बातमी
कास पठाराला तीन दिवसांत हजारो पर्यटकांची भेट

संबंधित बातम्या