पॅरा बुद्धिबळ स्पर्धेत साताऱ्याच्या संस्कृती मोरेंना सरकारकडून ३७ लाखांचे पारितोषिक

by Team Satara Today | published on : 07 May 2025


सातारा : क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल काम करणाऱ्या तसेच राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील पदक प्राप्त खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यासाठी शासनाने सहा कोटी ९४ लाख ३७ हजार रुपयांची मंजुरी दिली आहे. 

या खेळाडूंच्या यादीत पॅरा बुद्धिबळ स्पर्धेत सांघिक गटात कास्यपदक मिळविणाऱ्या साताऱ्याच्या संस्कृती मोरे यांचा समावेश असून, त्यांना ३७.५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मोरे या सातारा जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (वर्ग एक) या पदावर कार्यरत आहेत. हॅंगझोऊ (चीन) येथे सन २०२२ मध्ये झालेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत देशातील तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविले. या खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना व त्यांचे मार्गदर्शक यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सहा कोटी ९४ लाख ३७ हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली.

या खेळाडूंमध्ये साताऱ्याची संस्कृती मोरेंचा समावेश आहे. याबरोबरच त्यांना सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याबरोबरच राज्यातील मानसी जोशी (पॅरा बॅडमिंटन), सुकांत कदम (पॅरा बॅडमिंटन), सचिन खिलारी, भाग्यश्री जाधव, दिलीप गावीत (पॅरा ॲथलेटिक्स), आदिल अन्सारी (पॅरा आर्चरी), सुयश जाधव (पॅरा जलतरण), आर्यन जोशी (पॅरा बुद्धिबळ) यांना पारितोषिक देण्यात आले.

बुद्धिबळ खेळातील कामगिरीमुळे आतापर्यंत संस्कृती यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार, सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार, त्यांची सातारा जिल्ह्याच्या ब्रँड ॲम्बेसिडर म्हणूनही निवड झाली आहे. बुद्धिबळबरोबरच पियानो वाजविण्याचा त्यांना छंद आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करत देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. बसवेश्वर चेणगे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार
पुढील बातमी
ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

संबंधित बातम्या