सातारा : बदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुरडीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटर नंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचे समर्थन केलं, तर दुसरीकडे विरोधकांनी पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त करत टीकेची झोड उठवली आहे. मात्र भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे समर्थन करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, निष्पाप जीवांवर अत्याचार करणार्यांना सरळ लोकांसमोर फाशी दिली पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी हरकत नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो. सत्ताधारी विरोधक मला काही घेणं देणं नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केलं असतं, असा खडा सवाल त्यांनी केला.
बदलापूर प्रकरणातील आरोपी वरून ते म्हणाले, अशा गुन्हेगारांना गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. मात्र या लोकांना जनतेत सोडले पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अत्याचार करणार्यांना लोकांसमोर फाशी द्या
बदलापूर प्रकरणातील आरोपी एनकाउंटर वरून उदयनराजे यांची रोखठोक प्रतिक्रिया
by Team Satara Today | published on : 24 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा