पुणे : शालेय वाहतुकीच्या नियमानुसार स्कूल बसमध्ये 12 पेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्याची क्षमता असते. त्यामुळे स्कूल बसमध्ये महिला सहायक असणे आवश्यकच असते. मात्र, स्कूल व्हॅनची क्षमता ‘सेव्हन प्लस वन’ इतकी आहे. त्यामुळे आरटीओ अधिकार्यांनी स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी जबरदस्ती करू नये, अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली.
चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये आहे. शालेय वाहतुकीच्या वाहनांवर धडक कारवाई केली जात आहे. शालेय वाहनामध्ये जर नियमांचे पालन झाल्याचे दिसले नाही, तर तत्काळ दंडात्मक, जप्तीची कारवाई केली जात आहे. आरटीओकडून या कारवाईत काही स्कूल व्हॅनचालकांना देखील महिला सहायक नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शालेय वाहतुकीच्या (2011 च्या) नियमानुसार 12 पेक्षा अधिक विद्यार्थी क्षमता असेल, तरच महिला सहायक बंधनकारक आहे. मात्र, स्कूल व्हॅनची क्षमता 12 च्या आतच आहे, त्यामुळे आरटीओकडून होत असलेली ही कारवाई अन्यायकारक आहे, अशा भावना शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
नियम काय सांगतो..?
शालेय वाहतूकीच्या 2011 च्या नियमावलीमधील खंड 5 मध्ये बारापर्यंत आसनक्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये सहवर्तींची आवश्यकता असणार नाही. अशा बाबतीत सहवर्तींची कार्ये चालकाकडून स्वत: पार पाडण्यात येतील.
स्कूल व्हॅनची क्षमता शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियमानुसार 12 च्या आतच असेल, तर मग स्कूल व्हॅनचालक 12 पेक्षा अधिक मुलांची स्कूल व्हॅनमध्ये कोंबाकोंबी का करतात? अन् विद्यार्थ्यांच्या जिवाशी का खेळता? त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियमानुसारच विद्यार्थ्यांची ने-आण स्कूल व्हॅनचालकांनी करावी; अन्यथा आरटीओने तात्काळ कारवाई करावी.