सातारा : जिल्ह्यात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत डीजे दणाणला असतानाच आता विसर्जन मिरवणुकीतही हीच परिस्थिती निर्माण होण्याची धास्ती असलेल्या वाईतील काही सजग नागरिकांनी थेट पोलिसांनाच कायदेशीर नोटीस बजावली आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात हयगय झाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. या नोटीसची प्रत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही दिली आहे.
पोलिसांकडून एरवी नागरिकांना नोटीस बजावल्या जातात. परंतु, वाईत सजग नागरिकांनी पोलिसांनाच नोटीस बजावल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही नागरिकांनी पुढे येत गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदूषण होऊ नये, म्हणून महिनाभरापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यातून कायद्याचे पालन व्हावे यासाठी पोलिसांना नोटीस पाठवण्याची कल्पना पुढे आली. नागरिकांच्या वतीने ॲड. रामदास धनावडे यांनी वाई पोलिसांना नोटीस बजावली. या नोटीसवर दिलीप आफळे, शिवाजी जगताप, प्रशांत डोंगरे, भाऊ मेहता, प्रशांत नागपूरकर, प्रमोद भिसे, संतोष दाैंड, जितेंद्र जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत. आता पोलिसांकडून यावर काय अंमलबजावणी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
नोटीस कोणत्या कलमान्वये
ही नोटीस ही भारतीय दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ चे कलम ८० अन्वये देण्यात येत असून, तुमच्या विरुद्ध सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी कायद्याने आवश्यक असलेली पूर्वसूचना म्हणूनही याचा विचार करण्यात यावा. निर्धारित ध्वनी मर्यादेचा भंग झाला तर न्यायालयात तुमच्या विरुद्ध कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार राहील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात हयगय झाल्यास न्यायालयात खटला दाखल करू; सजग वाईकर नागरिकांनी थेट पोलिसांनाच बजावली कायदेशीर नोटीस
by Team Satara Today | published on : 17 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा