कमला निंबकर बालभवन च्या माजी विद्यार्थ्यांची संस्थेच्या 'आपली शाळा' येथील विद्यार्थ्यांच्या पौष्टिक खाऊसाठी सढळ हाताने मदत....!

by Team Satara Today | published on : 12 September 2025


फलटण : कमला निंबकर बालभवनचे माजी विद्यार्थी संग्राम लिंबाजी राऊत सध्या अमेरिकेत रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक विद्यार्थी घडवले. संग्राम लिंबाजी राऊत हे अमेरिकेतील प्रतिथयश व्यावसायिक असून आपल्या आई-वडिलांचा गरजूंना मदत करण्याचा वसा आणि वारसा ते अखंडपणे चालवत आहेत. त्यांनी यापूर्वीही प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनमधील उपक्रमांना मदत केली आहे. 

ते आवर्जून सांगतात की शाळेने त्यांना भरभरून दिले. मॅक्सिन आजी, मंजुताई, जगदाळे सर आणि सर्वच शिक्षकांनी परीघाबाहेर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच सर्व गुरुवर्यांनी दिला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन, अखिल मानव जातीविषयीचे प्रेम, व जात-धर्म-पंथविरहित माणूस आणि मानवतेचे नाते हे याच शाळेने जपायला शिकवले. त्यामुळे ते  शाळेचे खूप ऋणी आहेत आणि याच भावनेतून जेवढी होईल ती मदत करण्याची त्यांची भूमिका आहे.

ज्या ठिकाणी प्रगत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्याच ठिकाणच्या बालवाडीच्या चिमुकल्या मुलांसाठी सकस आहारासाठी मदत श्री. राऊत आज करत आहेत. 

'आपली शाळा' येथील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळालेल्या या अर्थसहाय्यातून रोज सकाळी मुले आल्यावर त्यांना सकस नाश्ता दिला जात आहे. सोमवार हरभरा उसळ किंवा मुगाची उसळ, मंगळवार अंडी, बुधवार सफरचंद, केळी किंवा ऋतूनुसार उपलब्ध फळे, गुरुवार राजगिरा लाडू किंवा शेंगदाणे लाडू किंवा चिक्की, शुक्रवार लापशी, उपमा, शिरा, मुगाची खिचडी यापैकी एक असे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. 

बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांनी संग्राम राऊत यांना या मदतीबद्दल धन्यवाद दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गावाच्या विकासात सर्वांना सोबत घ्या: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
कास पुष्प पठार परीसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

संबंधित बातम्या