सातारा : गोलबाग राजवाडा ते देवी चौक यादरम्यानच्या अत्यंत वर्दळीच्या राजपथावरील वाहतुकीची आणि एकंदर येथील व्यवस्थेची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शनिवारी पाहणी केली. राजपथावरील अतिक्रमण संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन दोन्ही बाजूला पार्किंगच्या सुविधा दिल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
यावेळी नगरसेवक जयवंतदादा भोसले, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत गोडसे, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
नगराध्यक्ष अमोल मोहिते व सातारा शहरातील व्यापारी यांच्यात येथील छत्रपती शिवाजी सभागृहांमध्ये बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा झाली. राजपथ हा संपूर्ण काँक्रीट होणार असून यासंदर्भामध्ये लवकरच निविदा प्रक्रियेनंतर कामाला सुरुवात होणार आहे. या कामाच्या संदर्भाने नगराध्यक्षांनी देवी चौक ते गोलबाग राजवाडा यादरम्यान चर्चेनंतर प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाऱ्यांशी सुद्धा विविध समस्यांवर चर्चा केली. राजपथावर असणारी अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी तसेच व्यापाऱ्यांची दुकाने खाली जाऊन रस्ता वर गेल्याने पावसाचे पाणी घरात जाते काही भागांमध्ये रस्त्यावरील पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही याबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या .राजपथावर आकर्षकजुन्या पद्धतीचे तुळशी दिवे लावण्यात आले आहेत या दिव्यांचा मेंटेनन्स सातत्याने होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली .बांधकाम अभियंता दिलीप छिद्रे व नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बारकाईने या समस्यांच्या नोंदी घेऊन प्रत्यक्ष काम करताना बांधकाम विभागाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मोहिते म्हणाले, सातारा शहरांमध्ये राजपथ हा सर्वात महत्त्वाचा रस्ता असून पोवई नाका व राजवाडा यांना जोडणारा तो वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करण्याच्या संदर्भाने विचार सुरू असून मंडईच्या खालच्या बाजूला पार्किंग तसेच जनावरांच्या जुन्या दवाखान्यालगत नवीन चौपाटी होणार असून तेथेही पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. राजपथाचे काँक्रिटीकरण करताना रस्त्याची लेवल बघूनच त्याचे बांधकाम केले जाणार असून पाण्याचा व्यवस्थित गटाराच्या माध्यमातून निचरा होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. राजपथावर विद्युत व्यवस्था ही रात्रीच्या वेळी पुरेशा प्रमाणात राहील तसेच कोठेही अस्वच्छता आढळणार नाही , अशी स्पष्ट वाही नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली.