एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० टक्के वाढ होणार

डॉ.विवेक भोईटे; अजिंक्यतारा कारखान्यावरील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कार्यशाळेस उत्सफुर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 06 August 2025


सातारा : पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते.ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे. सदर तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता मायक्रोसॉफ्ट कंपनी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मॅप माय क्रॉप, फसल व सिमू सॉफ्ट आदी कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकासह  सर्व पिकांच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन  ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भिते यांनी केले. 

ऊस पिकाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे आणि ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेला होता. याप्रसंगी डॉ. भोईटे बोलत होते. 

ऊस पिकाचा डाटा उलब्ध असल्यामुळे आणि साखर कारखाने व शेतकरी यांचे योग्य समन्वय असल्यामुळे सदर तंत्रज्ञानाचा वापर करणे सोयीचे होईल. या तंत्रज्ञानाद्वारे वाऱ्याचा वेग, पाऊस, प्रकाशाची तीव्रता, जमीनीतील आर्द्रता, पिकास केंव्हा व किती पाणी द्यावे, कोणते खत किती द्यावे, कोणता रोग येण्याची शक्यता आहे, रोग कोणत्या ठिकाणी आला आहे, त्यावर कोणते औषध किती फवारावे, ऊसाची वाढ कशी आहे, ऊस कधी पक्व होईल, किती साखरेचा उतारा मिळेल, किती उत्पादन मिळेल आदी सर्व बाबींची माहिती अगोदरच मिळते. ऊस वाढीसाठी सुरुवातीला खते न देता चौथ्या महिन्या पासून बारा महिन्या पर्यंत आवश्यकतेनुसार दिले तर उत्पादन वाढते, त्यासाठी ड्रीपने पाणी देण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी, खते आणि मजूरीचे खर्चात बचत होते. तसेच ऊसाचे ३० टक्के उत्पादन वाढवता येते, असे डॉ.विवेक भोईटे यांनी यावेळी सांगीतले. 

या तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून त्याचा वापर जास्तीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करावा म्हणून राज्य शासन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे आणि साखर कारखाने यांचे संयुक्त विद्यमाने प्रयत्न सुरु आहेत. एआय प्रणालीचा वापर करणेसाठी प्रती हेक्टरी रु. २५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, राज्य शासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साखर कारखाने अनुदान देणार असून शेतकऱ्यांनाही त्यांचा हिस्सा भरुन सहभागी व्हावे लागेल. सदर प्रणाली अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणेचे पिक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ.अशोक कडलग यांनी सांगीतले की, शेतकऱ्यांनी माती तपासणी करावी जेणे करुन मातीमधील घटकाची माहिती मिळते व ज्याची कमतरता आहे त्याची मात्रा देवून जमीनीचा पोत सुधारता येतो.

जमीनीमधील कर्ब वाढवणे आवश्यक आहे याकरिता ऊसाची पाचट न जाळता ते जमीनीत मिक्स करावे असे सांगीतले. ऊस उत्पादन वाढविणे करिता शुद्ध व प्रमाणित केलेल्या ऊस बियाणाचा वापर करावा आणि पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा असे आवाहन केले.

याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कारखाना नेहमीच अग्रेसर असतो. कारखाना कार्यस्थळावरील ऊस नर्सरी मार्फत शुद्ध बियाण्याचा पुरवठा केला जातो त्याच बरोबर ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ.कडलग आणि ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ.विवेक भोईटे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन केलेले आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. कारखाना कार्यक्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणेसाठी कारखाना अनुदान देणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे व पर्यायाने कारखान्याचेही उत्पन्नात वाढ होणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा व शेती विभागाच्या गट कार्यालयाशी संपर्क साधून आपली नांवे द्यावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, माजी चेअरमन सर्जेराव सावंत, रामचंद्र जगदाळे, कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी व शेती ऑफिस स्टाफ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक विश्वास शेडगे यांनी आभार मानले तर लेबर ऑफिसर रणजित चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य
पुढील बातमी
जिल्हा बॅकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल : मकरंद पाटील

संबंधित बातम्या