वाई तालुक्यातील घटना; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला

by Team Satara Today | published on : 24 May 2026


वाई : एकसर, पार्टेवाडी (ता. वाई ) येथे तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चौघा चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन सुमारे 1 लाख 55 हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

एकसर पार्टेेवाडी येथील शिवाजी देशमुख व त्यांची पत्नी सुमन देशमुख हे दोघे घराच्या पडवीत झोपले असता पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चौघा चोरट्यांनी कपाटांची उचकपाचक करत सोने आणि रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी सुमन देशमुख यांनी उशाजवळ ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरट्यांच्या नजरेस पडले. त्यातील एका चोरट्याने ते हिसकावून घेतले. तसेच सोन्याची फुले खेचण्याचाही प्रयत्न केला; मात्र ती खाली पडल्याने चोरट्यांना ती घेऊन जाता आली नाहीत.

शिवाजी देशमुख यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दांडक्याने मारहाण केली. सुट्टीसाठी गावी आलेला त्यांचा नातू पंकज देशमुख हा बेडरूममध्ये झोपला होता. त्याला आवाज आल्याने त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना दरवाजा बाहेरुन बंद केला होता. खिडकीतून पाहिले असता चारही चोरटे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा ; एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात कराड तालुका स्तरावर सावरघरला प्रथम क्रमांक; खोडजाईवाडी द्वितीय

संबंधित बातम्या