75 हजारांची लाच स्विकारताना मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : सातबाराची नोंद करुन देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत त्यापैकी 75 हजार रुपये स्वीकारताना कोडोली ता.साताराचा तत्कालीन मंडलाधिकारी अजित दादासाहेब घाडगे (वय 48, रा.वनवासवाडी ता.सातारा) याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

याप्रकरणातील तक्रारदार हे खिंडवाडी ता.सातारा येथील एका गटातील शेतजमीनीच्या झालेल्या दस्तामधील लिहून घेणारे यांच्यावतीने कुलमुखत्यार आहेत. हा दस्त 60 गुंठेचा आहे. मूळ मालक यांनी दस्तावरुन लिहून घेणार यांचे नाव सातबारावर न लागल्याचा फायदा घेवून विक्री केलेल्या 60 गुंठ्यापैकी 13 गुंठे जमीन विक्री केली आहे. यानंतर 2024 मध्ये मूळ मालक यांनी पुन्हा उर्वरीत 47 गुंठ्यापैकी 10 गुंठे जमीन ही विक्री केली. त्यावरुन तलाठी खिंडवाडी यांनी 10 गुंठे जमीनीची नोंद सातबारावर धरली.

यामुळे तक्रारदार यांनी मंडलाधिकारी कोडोली यांचेकडे कुलमुखत्यारदार या नात्याने आक्षेप नोंदवला. त्यावर मंडलाधिकारी कोडोली यांनी आक्षेपावरुन सुनावणी अंती तक्रारदार यांचा आक्षेप मान्य केला व 10 गुंठे जमीनीच्या नोंदीणीस स्थगिती दिली. दि 22 मे 2025 रोजी मंडलाधिकारी अजित घाडगे याने तक्रारदार यांना तुमच्या आक्षेपावरुन सदरचा फेरफार रद्द केला असल्याचे सांगितले. त्या कामाची व सातबारावरील उर्वरीत 47 गुंठे याची नोंद तुमच्या बाजूने देतो असे दोन्ही कामाचे मिळून 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

मंडलाधिकारी यांनी तक्रारदार यांना चालू दस्त, सातबारा वरील सर्व कागदपत्रे व नोंद करण्याबाबतचा अर्ज तलाठी कार्यालय खिंडवाडी यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले. सातबाराची नोंद घ्यायची काम माझे, तुम्ही फक्त मला 1 लाख रुपये पोहोच करा. तलाठी कार्यालयातील नोंद व नोंदीवरुन फेरफार उतारा चौकशी करुन सातबारावर तुमचे नाव लावण्याची जबाबदारी माझी असे म्हणत घाडगे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाच मागणी केली.

लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार केली. एसीबी विभागाने तक्रार घेवून पडताळणी केली. दि. 3 व 4 जून रोजी पडताळणी झाली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. 1 लाख रुपयांवरुन 75 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम गुरुवारी दुपारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. रोख 75 हजार रुपये स्वीकारताना घाडगे याला एसीबी विभागाने रंगेहाथ पकडले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलीस नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या