सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नावर मंत्रालय स्तरावर मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली असून, त्या अनुषंगाने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक अत्यंत सकारात्मक ठरल्याचे मत डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
गेल्या २३ तारखेपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावळी, महाबळेश्वर, पाटण, कोरेगाव तसेच इतर जिल्ह्यांत विस्थापित झालेल्या कोयना धरणग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड आणि पुनर्वसन तहसीलदार श्रीमती सनदे यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आजची चर्चा महत्त्वपूर्ण ठरली. कोणत्या जिल्ह्यात किती कोयना धरणग्रस्त विस्थापित झाले, १९९० च्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात किती जणांना जमीन वाटप झाले, जलाशय परिसरात किती जणांचे पुनर्वसन झाले, दुबार वाटप, अंशतः वाटप आणि अजिबात जमीन न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांचा तपशील असा सर्व डेटा पुनर्वसन कार्यालयाने नव्याने तयार केला आहे. त्याची अद्ययावत प्रत संघटनेला देण्यात येणार आहे.”
पुढे ते म्हणाले की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय हे केंद्र मानून इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातात; मात्र त्या काही काळापासून बंद होत्या. आता सर्व जिल्ह्यांचा अद्ययावत डेटा मागवून २५ मार्च रोजी पुढील बैठक घेण्यात येणार आहे.
आंदोलन मागे घेण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले असता डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले की, “मंत्रालय पातळीवरील बैठकींचा पूर्वानुभव प्रकल्पग्रस्तांसाठी समाधानकारक नाही. त्यामुळे अधिकृत पत्र मिळाल्यानंतरच लोकांचा विश्वास बसेल. पुनर्वसन मंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांशी संपर्क साधण्यात आला असून आज संध्याकाळपर्यंत मार्चच्या पहिल्या आठवड्यातील बैठकीची तारीख व वेळ कळविण्यात येईल. पत्र प्राप्त झाल्यानंतर उद्या सकाळी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेऊ.”
दरम्यान, कोयना धरणग्रस्तांच्या संदर्भातील याचिकेची मुंबई उच्च न्यायालयात उद्या (दि. २६) सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगाने न्यायालयात कोणती माहिती सादर करावी लागेल, यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.
बैठकीस संतोष गोटल, ॲड. शरद जांभळे, गणेश भिसे, प्रकाश साळुंखे, किसन सुतार, पांडुरंग लाड, श्रीपती माने, एकनाथ लाड, दाजी शेलार, आनंदा सपकाळ, रामभाऊ शेलार, ज्ञानबा भोसले, किसन जाधव, प्रभाकर चव्हाण यांच्यासह प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.