सातारा : सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पदे मिळाल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला चार मंत्री पदे मिळाली आहेत. त्या सर्वांच्या हातून जनकल्याणाचे काम व्हावे, या शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना आगामी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा असणार्या सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसने घोषणा पलीकडे काहीच केले नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा कार्यभार जाहीर झाल्यानंतर त्यांनी सातार्यात येऊन प्रथमच खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे जावून सोमवारी भेट घेतली. त्यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शाल घालून विशेष सत्कार केला.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याला चार मंत्री मिळाले आहेत. या चारही मंत्र्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून जिल्ह्यातील व राज्यातील जास्तीत जास्त लोकांचे कल्याण व्हावे. शिवेंद्रसिंहराजांच्या हातून निश्चित कल्याण होईल. छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी हा मतदारांचा कौल होता. जिल्ह्यातील अनेकांना यापूर्वी संधी मिळाली पण त्यांनी काही केलं नाही. सातारा हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अशी परिस्थिती का झाली ? कॉंग्रेस पक्षाने तर केवळ घोषणा केल्या. आता या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित राहून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमच्या मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यानुसार मला मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपची मोठी ताकद जिल्ह्यात निर्माण झाली आहे. ती ताकद उदयनराजे यांच्या नेतृत्वातून तयार झाली आहे. यावेळी भाजप जिल्ह्यात खोलवर किती रुजला आहे, हे या निवडणुकांतून दिसून आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्या. यापुढे उदयनराजे नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून काम करू. राज्य आणि केंद्र यांचा एकत्र समन्वय साधून जिल्हा विकासाच्या वाटेवर नेऊ, असे ते म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सायरन वाजून जलमंदिर मधून बाहेर पडण्याचा सल्ला देताच तेथे उपस्थितांमध्ये त्यामध्ये एकच हशा पिकला. शिवेंद्रसिंहराजे यांनी सायरन वाजवल्याशिवाय मी त्यांना इथून जाऊ देणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच पालकमंत्री पदाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी काहीतरी ठरवलं असेल. ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्यांना संधी देण्याचा विचार झाल्यास शिवेंद्रसिंहराजे यांना पालकमंत्री पद मिळायला हवे. कराडच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालक उदयनराजे आहेत, असे सांगितले होते. याची आठवण शिवेंद्रसिंहराजे यांनी करून दिली. त्यावर उदयनराजे म्हणाले, तसे काही नाही. पण थोडेफार कॅप्टनचे ऐकले पाहिजे. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, तर समजून घ्यायच्या असतात. जो सर्वांना एकत्र घेऊन पुढे जातो त्याला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.