‘आयर्नमॅन हॅम्बुर्ग’मध्ये यश मुचंडीचा ठसा

सायकलिंग, पोहणे अन्रनिंगमध्ये २२६.३ किलोमीटरचे अंतर केले पार

by Team Satara Today | published on : 11 June 2025


सातारा : कडाक्याची थंडी, वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार पाऊस अंगावर झेलत साताऱ्यातील यश विवेक मुचंडी यांनी हॅम्बुर्ग येथे झालेल्या आयर्नमॅन हॅम्बुर्ग २०२५ (२२६.३ किलोमीटर) स्पर्धेत ठसा उमटवला. यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर (मॅरेथॉन) धावणे यांचा समावेश होता.

या स्पर्धेतील यशाविषयी मुंचडी म्हणाले, ‘‘स्पर्धेचा प्रारंभ सहा वाजता होणार होता; परंतु जोरदार पावसामुळे एक तास उशिरा स्पर्धा सुरू झाली. आपल्या देशातील उन्हाळ्यानंतर थेट ७-८ डिग्री तापमानाच्या थंड हवामानात स्पर्धा जिद्दीने पूर्ण केली. पोहताना पाण्याचे तापमान ५-६ डिग्री सेल्सिअस होते. त्यामुळे प्रारंभीच्या काही मिनिटांतच शरीर बधीर झाले. प्रत्येक स्ट्रोक हा संघर्षमय वाटत होता, तरीही जिद्दीने पोहत पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झालो.’’

सायकलिंगच्या १८० किलोमीटर प्रवासात समोरून येणारा मोठ्या प्रमाणातील वाऱ्याचा अडथळा होत होता. त्यातच जीपीएसचा सिग्नल अधून मधून जात होता. काही वेळेला तर मिळतच नव्हता. परिणामी, मार्ग ओळखण्यात अडचण आली, तसेच हायड्रेशनसाठी आवश्यक असणाऱ्या बाटल्या हरवल्या. यामुळे तसेच मार्गक्रमण करत निश्चित केलेल्या वेळेत टप्पा पार केला.

धावत असताना पहिल्या सात किलोमीटरपर्यंत शरीराला आवश्यक असणारी अंतर्गत ऊर्जा मिळाली नाही, तरीही संयम ठेवत, हृदयगती नियंत्रित ठेवून ४२.२ किलोमीटरचा टप्पाही यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या यशाबद्दल मुंचडींचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच धावपटूंचे प्रेरणास्थान असलेले डॉ. संदीप काटे, डॉ. सुधीर पवार, जयंत शिवदे, संतोष जगदाळे, भाविका मुथा आदींनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
आठ तोळ्याचे गंठण धूम स्टाईलने लंपास

संबंधित बातम्या