सातारा : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत, जनतेसह वाहनचालक आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवल्या पाहिजेत, अशा सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या आहेत. राज्यातील रस्ते, पूल व इतर प्रकारची बांधकामे वेळेत पूर्ण करून जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील रा.मा. १०३ कि.मी. ३/८०० चिपळे येथे नेरे - मालढुंगे या नवीन पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. या पुलाच्या लोकार्पणप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या चौफेर विकासासाठी बांधकाम विभागामार्फत नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार करणे, सर्वप्रकारची कामे वेळेत पूर्ण करणे, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. नेरे - मालढुंगे या नवीन पुलामुळे नेरे तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांसाठी वाहतुकीची मोठी सुविधा निर्माण झाली असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे चालना मिळणार असल्याचेही ते म्हणाले.