सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास, अचूक माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर हरवलेले 25 स्मार्टफोन शोधून काढत सुमारे 6 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला. या कारवाईत पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपल्या तपास कौशल्याची प्रचिती पुन्हा एकदा दिली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सीईआयआर पोर्टल, मोबाईल ट्रॅकिंग प्रणाली आणि इतर तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधला. प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून आणि सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले 25 स्मार्टफोन शोधण्यात यश आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सांगितले की, हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी अशाच प्रकारच्या तांत्रिक मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी शैलेंद्र गोवेकर तसेच पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.