सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास अधिक गतिमान करण्याबरोबरच मंजूर विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या तालुकानिहाय आढावा बैठकीत त्यांनी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत अधिकार्यांना कामकाजाबाबत सूचना केल्या.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक झाली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली कामे, प्रस्तावित विकासकामे, त्यांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि गुणवत्ता याबाबत चर्चा करण्यात आली. काही कामे प्रलंबित राहण्याची कारणे, प्रशासकीय अडचणी आणि कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागातील रस्ते, सार्वजनिक बांधकामे आणि अन्य पायाभूत सुविधांचा दर्जा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. संबंधित अधिकार्यांनी कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रगतीची पाहणी करावी, तसेच प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तालुकानिहाय गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करावे आणि नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशा पद्धतीने बांधकाम विभागाने लोकाभिमुख कारभार करावा, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, बांधकाम विभागाचे सचिव राजभोज, अभियंते हांडे व पवार, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा शिंदे, लता कर्णे, अजित साळुंखे, पूजा मोरे, सर्जेराव सावंत, नीता खरात, कामेश कांबळे, अमित चव्हाण, लालासाहेब जगदाळे, रणजित पाटील, मदनभाऊ काळभोर, हनुमंत जगदाळे, शैलजा शिंदे, प्रियंका साळुंखे, पंचायत समिती सभापती महेश गाडे, राहुल शिंदे, जावळीचे सभापती सौरभ शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकार्यांना निर्देश, जि. प. बांधकाम विभागाचा घेतला तालुकानिहाय आढावा
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा