सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांकडून सुरू असलेल्या वाहन तपासणीच्या अधिकारांवर थेट बोट ठेवणाऱ्या ‘सातारा टुडे’च्या एका चित्रफितीने समाजमाध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, अवघ्या १२ तासांत तब्बल १० लाखांहून अधिक प्रेक्षकसंख्येचा टप्पा पार केला आहे.
सामान्य प्रवाशांच्या रोजच्या त्रासाला आणि कायदेशीर अधिकारांना वाचा फोडणाऱ्या या रोखठोक वार्तांकनाला नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून, या निमित्ताने महामार्गावरील पोलिसांच्या तपासणीचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे.
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी खेड शिवापूर आणि आनेवाडी टोलनाका म्हणजे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारे केंद्र बनले आहे. अशातच खेड शिवापूर टोलनाक्यावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून संशयास्पद वाहने अडवून तपासणी करण्याची मोहीम राबवली जात होती. याच दरम्यान महामार्गाने प्रवास करणाऱ्या ‘सातारा टुडे’च्या एका सुजाण आणि जागरूक वाचकाने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांना कायद्याचा आरसा दाखवला. कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय, ठोकळ संशयावरून अथवा विनाकारण सामान्य नागरिकांच्या वाहनाची मागची डिक्की उघडून तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या नियमावलीने दिला आहे, असा थेट आणि धारदार सवाल या वाचकाने उपस्थित केला.
एवढेच नव्हे तर, केंद्रीय मोटार वाहन कायदा आणि खुद्द वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देत संबंधित नागरिकाने पोलिसांची बोलती बंद केली. सामान्य नागरिकांना रस्त्यावर वेठीस धरून खासगी जागेसारखी वाहनांची तपासणी करणे कितपत योग्य आहे, असा जाब विचारतानाच, यापूर्वी ‘सातारा टुडे’ने आनेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यावरील वाहन तपासणीच्या बेकायदेशीरपणावर प्रकाश टाकणाऱ्या प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्ताचा दाखलाही घटनास्थळी देण्यात आला. अचानक घडलेल्या या कायदेशीर युक्तिवादामुळे कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांची काही काळ चांगलीच भंबेरी उडाली. या प्रश्नांवर समाधानकारक कायदेशीर उत्तर न देता आल्याने शेवटी पोलिसांनी यावर वरिष्ठांशी बोला, असे सांगत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण घडामोडींचे घटनास्थळी झालेले थेट चित्रीकरण ‘सातारा टुडे’च्या अधिकृत फेसबुक पानावर प्रसारित करण्यात आले. ही चित्रफीत प्रसिद्ध होताच अवघ्या काही मिनिटांतच ती समाजमाध्यमांवर तुफान वेगाने पसरली. १२ तासांच्या आत तब्बल १० लाख नागरिकांनी ही चित्रफीत पाहिली असून, हजारो वाहनचालकांनी आपल्या संतप्त आणि वास्तववादी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रोजच्या प्रवासात टोलच्या नावाखाली खिसा रिकामा करायचा आणि पुढे पोलिसांच्या अडवणुकीचा सामना करायचा, या दुहेरी कात्रीत अडकलेल्या सामान्य प्रवाशांचा आक्रोश या चित्रफितीच्या माध्यमातून उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो नागरिकांनी ही चित्रफीत सामायिक करत महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
खेड शिवापूर आणि आनेवाडी टोलनाक्यावर वाहन तपासणी करताना नेमकी कोणती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते, डिक्की उघडून पाहण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत की नाही, आणि जर तसे आदेश असतील तर त्याचे अधिकृत परिपत्रक सार्वजनिक का केले जात नाही, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारी आणि व्यवस्थेला थेट जाब विचारणारी निर्भीड पत्रकारिता हीच ‘सातारा टुडे’ची ओळख असून, समाजमाध्यमांवर मिळालेला हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे याच जनसामान्यांच्या विश्वासाची पावती मानली जात आहे. आता या प्रकारानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी कायदेशीर स्पष्टीकरण देऊन प्रवाशांना दिलासा देणार की ही मनमानी अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.