'हुतात्मा दिनी' सकाळी ११ वाजता दोन मिनिटे स्तब्ध राहून वाहिली जाणार आदरांजली - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 29 January 2026


सातारा  : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी राज्यभरात 'हुतात्मा दिन' पाळण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या दिवशी सातारा जिल्ह्यातही सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

 या संदर्भातील सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हुतात्मा दिनानिमित्त मौन पाळण्यासाठी

सकाळी १०:५९ ते ११ मौन सुरू होण्यापूर्वीचा पूर्वसूचना देणारा इशारा भोंगा वाजविला जाईल.

सकाळी ११ ते ११:०२: या दोन मिनिटांच्या कालावधीत सर्व नागरिकांनी जिथल्या तिथे थांबून स्तब्धता (मौन) पाळावयाची आहे.

सकाळी ११:०२ ते ११:०३: मौन कालावधी संपल्याचा इशारा देणारा भोंगा वाजविला जाईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी भोंग्याची (सायरेनची) व्यवस्था उपलब्ध नाही, त्या ठिकाणी संबंधितांनी सकाळी ठीक ११ वाजता मौन पाळण्याबाबत स्वतंत्र निर्देश द्यावेत, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हुतात्म्यांना आदरांजली वाहताना ती अत्यंत गंभीरपणे आणि योग्य त्या आदराने पाळली जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही  देण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर; आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

संबंधित बातम्या