सातारा : राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा 'आनंदाचा शिधा' यावर्षी सातारा जिल्ह्यात न दिल्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांचे दिवाळे निघाले. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून विशेष करून महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून ऐन दिवाळीत गोरगरिबांवर शिमगा करण्याची वेळ आली.
दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये पिवळे आणि केशरी रेशनिंग कार्ड असलेल्या गोरगरिबांना केवळ १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल देण्याचे जाहीर केले होते. या योजनेचा लाभ राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना मिळत होता. या आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल ५६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. गरिबांसाठी संजीवनी ठरणारी ही योजना शिंदे -फडणवीस सरकारने प्रत्येकात आणली त्यानंतर मात्र या योजनेला घरघर लागल्याचे चित्र दिसून आले.
काही महिन्यापूर्वी झालेल्या गणेशोत्सव कालावधीत आनंदाचा शिधा गोरगरिबांना मिळाला नाही. राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवला जाणारा 'आनंदाचा शिधा' या वर्षी सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेला नाही. परिणामी, अनेक कुटुंबांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त धान्य, साखर किंवा तेल यांचा लाभ मिळणार नाही. यामुळे महागाईच्या झटक्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे.
दिवाळी संपली, पण सरकारकडून 'आनंदाचा शिधा' दिला नाही ! सणासुदीच्या काळात महागाईने आधीच कंबर तोडली असताना, यंदा आनंदाचा शिधा दिला नसल्याने लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबांची दिवाळी अक्षरशः 'फिकी' झाली आहे.