शेखर गोरेंची 'वेट अँड वॉच' भूमिका; फडणवीसांवर उघड नाराजी, शिवसेना प्रवेशावर सस्पेन्स कायम

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या राजकीय भूमिकेवरून सध्या माण-खटावसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोरे यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अद्याप त्यांनी कोणताही अंतिम निर्णय जाहीर न करता 'वेट अँड वॉच'चे धोरण स्वीकारल्याने त्यांचा सस्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळला नाही, असा थेट आरोप करत शेखर गोरे यांनी आपली तीव्र नाराजी उघडपणे चव्हाट्यावर आणली आहे. या विधानाने भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वाला मोठा राजकीय इशारा मिळाल्याचे मानले जात आहे.

आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये सक्रिय असताना त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी घेतलेली उघड बंडखोर भूमिका जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नव्या वादाला तोंड फोडणारी ठरली आहे. सहकार क्षेत्रातील भक्कम पकड आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे यामुळे शेखर गोरे यांचा निर्णय केवळ पक्षबदलापुरता मर्यादित राहणार नसून आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर त्याचे थेट पडसाद उमटणार आहेत. शिवसेनेत जाणार असल्याचे गोरे यांनी अद्याप थेट मान्य केलेले नाही आणि तो दावा फेटाळलेलाही नाही. "योग्य वेळी सर्व स्पष्ट करू," असा सूचक पवित्रा घेत त्यांनी पत्ते गुलदस्त्यातच ठेवले असून, त्यांच्या या राजकीय हालचालींमुळे आगामी काळात जिल्ह्यातील अनेक मातब्बरांचे राजकीय गणित बिघडणार हे मात्र निश्चित दिसत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रात कूपरकडून नवीन प्रकल्पाची घोषणा; साता-यातील ३०० हून अधिक तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी

संबंधित बातम्या