सातारा : मराठा साम्राज्याच्या इतिहासात साताऱ्यातून अखंड हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या थोरल्या छत्रपती शाहू महाराजांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांच्या प्रगल्भ कारकीर्दीत मराठ्यांच्या सत्तेने अभूतपूर्व विस्तार साधला आणि दिल्लीपासून दक्षिणेपर्यंत वर्चस्व निर्माण झाले. साताऱ्याच्या या संस्थापकांचे राजवेशातील, पूर्णाकृती आणि दुर्मिळ चित्र प्रथमच प्रकाशात आले आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक निलेश झोरे यांनी दिली. हे चित्र केवळ एक कलाकृती नसून मराठा साम्राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि आपल्या ऐतिहासिक स्मृतीचा अमूल्य ठेवा ठरले आहे.
राजेशाही थाट आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप
या चित्रात छत्रपती शाहू महाराज पूर्ण आकारात अत्यंत दिमाखात उभे असलेले दिसतात. त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मंदिल असून कपाळावर स्पष्ट विष्णूनाम अंकित केलेले आहे. चेहऱ्यावरील रुबाबदार मिशा आणि शांत, पण अधिकारपूर्ण भाव एका सार्वभौम सम्राटाचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. त्यांनी परिधान केलेला गडद हिरवा राजवेश, लाल शेला, सुवर्णाचा कंबरपट्टा, गळ्यातील मोत्यांच्या माळा आणि कानातील कुंडले मराठा दरबारातील समृद्धीची साक्ष देतात.
विशेष म्हणजे, त्यांच्या हातातील राजदंड हा सत्तेसोबतच न्याय आणि धर्मपालनाचे प्रतीक म्हणून लक्ष वेधून घेतो. प्रत्येक अलंकार अत्यंत बारकाईने रेखाटलेला असून, या चित्रात चित्रकाराने राजेशाही दिमाख आणि सौंदर्य यांचा उत्तम समन्वय साधला आहे.
कलाशैली आणि ऐतिहासिक मूल्य
हे चित्र महाराजांच्या निधनानंतर साधारण शंभर वर्षांनी रेखाटले गेले असले, तरी त्याचे सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. चित्रावर मराठा-दख्खनी आणि राजस्थानी चित्रपरंपरेचा सुंदर प्रभाव दिसून येतो. तत्कालीन समाजाने आपल्या छत्रपतींविषयी जपलेला निसीम आदर आणि राजवैभवाची कल्पना या कलाकृतीतून स्पष्टपणे साकार झाली आहे.
आज छत्रपती शाहू महाराजांच्या (थोरले) इतिहासाशी संबंधित कागदपत्रे नव्याने समोर येत आहेत आणि त्यातून त्यांच्या कार्याचा इतिहास अधिक व्यापकपणे उलगडत आहे. अशा वेळी त्यांच्या राजवेशातील हे दुर्मिळ चित्र प्रकाशात येणे ही मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. इतिहास हा केवळ लिखित पुराव्यांवर उभा नसतो. दृश्य पुरावेही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या या अप्रकाशित राजप्रतिमेमुळे मराठा इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे दृश्य परिमाण प्राप्त होईल, असा विश्वास वाटतो.
- निलेश झोरे, इतिहास अभ्यासक