सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराचा यावर्षीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याबाबत दरवर्षी कास पठार कार्यकारी समितीकडून हंगामाचे संपूर्ण नियोजन केले जाते. याबाबतचा आढावा सातारा जिल्ह्याचे नूतन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी (दि.६) कास पुष्प पठाराला भेट देऊन घेतला. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा हंगाम हा लवकर सुरू होणार असून सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम कालावधीतील पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचे पूर्णपणे नियोजन केले जाते. याचीच सखोल माहिती घेऊन पठार परिसराची पाहणी करण्यासाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी आपल्या संपूर्ण टीम समवेत कास पुष्प पठाराला भेट दिली.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सातारा प्रदीप रौंदळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा ए एस जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी जावली अर्जुन गमरे, वनपाल रोहोट राजाराम काशीद, वनपाल बामणोली उज्ज्वला थोरात, वनपाल मेढा मारुती माने, वनरक्षक समाधान वाघमोडे, दत्तात्रय हेर्लेकर, प्रकाश शिंदे यांचे सह कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, उपाध्यक्ष प्रदीप कदम, समिती सदस्य ज्ञानेश्वर आखाडे, संतोष आटाळे,सीताराम बादापुरे यांचे सह इतर सदस्य देखील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपवनसंरक्षक यांनी कास पठार कार्यकारी समितीच्या व वनविभागाच्या उपस्थित अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांच्याकडून दरवर्षी केल्या जाणाऱ्या नियोजनाबाबत प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण पठार परिसराची पाहणी केली. त्यानंतर हंगामाबाबत सूचना देताना त्यांनी प्रामुख्याने येणाऱ्या पर्यटकांना पुरेशी निवारा व्यवस्था तसेच पार्किंग पासून ते संपूर्ण कास पुष्प पठारावर ठिकठिकाणी सुलभ शौचालय व्यवस्था त्याचप्रमाणे चार चाकी साठी प्रशस्त पार्किंग तसेच दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था यासह कुमुदिनी तलाव व भदार तळे या दोन्ही ठिकाणी पर्यटक सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सेल्फी घेत असताना एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून दोन्ही तळ्यांच्या सभोवताली संरक्षक जाळी मारण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या ज्या परिसरामध्ये पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर जातात. त्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करावी. यासह संपूर्ण पठार परिसरामध्ये फुलांचा परिसर व वनविभागाचा परिसर वगळता खासगी क्षेत्रामध्ये परिसरातील छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आपला व्यवसाय करू शकतात, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाचे या परिसरामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रितपणे हंगाम सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर करावी व यावर्षीच्या हंगामामध्ये येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा देण्यात येतील, यावर भर देण्यात यावा. पर्यटकांना सुविधा देण्याबरोबरच कास पुष्प पठारावरील उमलणाऱ्या वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांचे संवर्धन व संरक्षण करण्याची देखील तितकीच जबाबदारी ही कास पठार कार्यकारी समिती सोबतच वनविभागाची देखील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे पर्यटकांबरोबर पठाराची देखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.