वाई : शेकडो वर्षापासून चालत आलेल्या वाईतील श्री. कृष्णामाईच्या पारंपारिक उत्सवास भीमकुंड आळीतील धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकीने उत्सवात प्रारंभ झाला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व कार्याध्यक्ष उमेश रास्ते यांनी दिली.
भीमकुंड आळी उर्फ भिमाशंकर संस्थान घाट उत्सवाची सुरुवात सकाळी आठ वाजता उदकशांत (मंडप शुध्दीसाठी) त्यानंतर सकाळी दहा वाजता '' श्री '' चा छबिन्याने झाली. यावेळी पालखीतून, '' श्री'' ची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य, गुलाल उधळण्यात आला. या वेळी आळीतील लहाणांपासून थाेरा माेठ्यांपर्य़ंत सहभाग घेतला हाेता. त्यानंतर रात्री मिरवणुक झाल्यावर ''श्री'' ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पाच दिवसांच्या उत्सवात मंगळवार (ता.२०) सकाळी १० ते एक पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी व पाचवी ते सातवी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता मंत्रजागर (पुरुष), तीन वाजता मैत्रयी गुप ' यांचा मंत्रजागर, चार वाजता कृष्णाई भजनी मंडळ यांचे भजन, पाच वाजता मुरलीधर भजनी मंडळ यांचे भजन, रात्री साडे नऊ वाजता विनयाताई पुंडे यांचे " साठी नंतरच्या आरोग्याची गुरुकिल्ली " या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी १० ते २ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते १२ वी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता मैत्रेयी ग्रुपचे श्री सूक्त पठण, दुपारी चार वाजता गार्गी भजनी मंडळ (धर्मपुरी) यांचे भजन, पाच वाजता वीरशैव महिला मंडळ यांचे श्री सूक्त पठण, रात्री साडे नऊ वाजता
आदित्य चौंडे व लौकिका रास्ते - गोखले यांचे " वैराजक्षेत्रातील कृष्णा " हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळी ११ ते ३ आळीकर व निमंत्रितांसाठी महाप्रसाद, रात्रौ साडे नऊ वाजता निरंजन मनमाडकर याचे दैवी भागवत ' भक्तराज ' सुदर्शन आख्यान हे प्रवचन होणार आहे. शुक्रवारी (ता.२३) दुपारी चार वाजता सावित्री साळुंखे (लाखानगर ) यांचे गायन, पाच वाजता नीलिमा पंडित, वाई व सहकारी यांचा ' आनंद उत्सव ' हा महाराष्ट्रातील महत्वाच्या सणाचे नृत्यरूपी आविष्कार असलेला कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता संस्थानचे हळदी- कुंकु व साडी लिलाव, रात्री साडेनऊ वाजता कौस्तुभ वैद्य यांचे लळीताचे कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे. याशिवाय दररोज सकाळी साडेपाच वाजता माऊली मंडळ (लाखानगर) यांची काकड आरती, सकाळी आठ वाजता 'श्री' साठी रुद्राभिषेक, रोज सायंकाळी सात वाजता महाआरती, मंत्रपुष्प तसेच त्यानंतर आळीतील महिलांचे श्री.विष्णूसहस्त्रनाम पठण होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व कार्याध्यक्ष उमेश रास्ते यांनी दिली.
उत्सवाची वैशिठ्ये
* कृष्णातीरावरील सात घाटावर एका पाठोपाठ एक याप्रमाणे माघ शुद्ध ते फाल्गुन वद्य द्वादशी पर्यंत सुमारे दीड महिना हा उत्सव सुरू असतो.
* ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेला हा उत्सव लोकवर्गणीतून साजरा होतो.
* प्रत्येक घाटावर चार ते पाच दिवस चालणा-या या उत्सवात धार्मिक, भजन, किर्तन प्रवचन, गायन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
* मधलीआळी उर्फ सत्यनाथपुरी संस्थान घाट (शुक्रवार, ता. २३ ), धर्मपुरी उर्फ रवी धुंडी संस्थान घाट ( बुधवार ता. २८ ), गणपती आळी उर्फ काशीविश्वेश्वर घाट ( सोमवार, ता. २ फेब्रुवारी), ब्राम्हणशाही उर्फ चक्रेश्र्वर संस्थान घाट (रविवार, ता.८), रामडोहआळी उर्फ कृष्णा रामेश्वर घाट. (गुरुवार, ता. १९), गंगापुरी उर्फ उमामहेश्वर घाट (सोमवार ता.२३ ) असे उत्सव होणार आहेत.