पुन्हा कण्हेरमधून विसर्ग

by Team Satara Today | published on : 02 July 2025


सातारा : सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून उघडझाप करणार्‍या पावसाने पुन्हा सोमवारपासून जोर धरला आहे. शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याचा येणारा फ्लो हा 3 हजार 122 क्युसेक असल्याने धरण 69.28 टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून पुन्हा 1 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. 

मान्सूनचे आगमन झाल्यापासून परिसरात 333 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. महिनाभर झालेल्या दमदार पावसाने धरणातील पाण्याची पातळी 198.15 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे जुलैच्या सुरुवातीलाच 7 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच धरणाच्या पश्चिमेकडील भागात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हे पाणी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

सध्या धरणाच्या सांडव्यावरून 1000 क्युसेक व विद्युत ग्रह प्रकल्पामधून 700 क्युसेक पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे वेण्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील कामे ठप्प झाले आहेत. परिसरातील ओढे व नाले वाहत असून परिसर ओलाचिंब झाला आहे. अद्यापही 80 टक्के पेरण्या रखडल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडपीठासाठी जागा आरक्षित करा !
पुढील बातमी
अवैधरीत्या जनावरांची वाहतूकप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या