सुरक्षिततेच्या दृष्टीने साताऱ्यात बसणार उच्च दर्जाचे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस यंत्रणेचा प्रस्ताव नियोजन समितीकडे होणार दाखल

by Team Satara Today | published on : 03 February 2026


सातारा  : सातारा शहर आणि हद्दवाढ क्षेत्रातील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणारा असून याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव सातारा जिल्हा पोलीस तयार करत आहेत. सुमारे तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  त्यासाठी सातारा नगरपालिका आणि सातारा पोलीस संयुक्तपणे सर्वेक्षण करणार असल्याची प्राथमिक चर्चा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बोलवलेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीमध्ये वाहतूक व्यवस्था सिग्नल यंत्रणा याशिवाय वाहतूक व्यवस्थांचे सुलभीकरण याविषयी चर्चा करण्यात आली तसेच या स्वतंत्र विषयांवर वेगळी बैठक बोलावली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

सातारा शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि वर्दळीच्या भागांतील वाहतुकीच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान सातारा शहरात वाढत चाललेल्या टपऱ्यांची संख्या, त्यामुळे होणारी अतिक्रमणे व वाहतुकीस होणारा अडथळा यावरही विशेष चर्चा करून प्रकाश टाकण्यात आला. टपऱ्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन व अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.दरम्यान, जिल्हा नियोजन निधीतून सातारा शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना विशिष्ट आराखड्यांतर्गत राबविण्यात येणार असून, या कॅमेऱ्यांचा संपूर्ण कंट्रोल पोलिसांकडे राहणार आहे.

तीन ते पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

या प्रकल्पासाठी साधारण तीन ते पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बसविण्यात येणारे सर्व कॅमेरे हाय-रेझोल्यूशनचे असून विशेष म्हणजे हे सर्व कॅमेरे वायरलेस असणार आहेत. त्यामुळे वायर कट होणे किंवा तांत्रिक अडचणीमुळे कॅमेरे बंद पडण्याची शक्यता कमी होणार आहे.रात्रीच्या वेळेस पण स्पष्ट चित्र दिसेल असे कॅमेरे असणार आहेत.

सध्या सातारा शहरात केवळ ३२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. त्यापैकी काही कॅमेरे मेंटेनन्सअभावी बंद अवस्थेत आहेत. मात्र नव्या योजनेत सध्याच्या संख्येपेक्षा तिप्पट कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने गुन्हेगारी तपास, वाहतूक नियंत्रण आणि शहराच्या एकूण सुरक्षेस मोठा फायदा होणार आहे. या सीसीटीव्ही नेटवर्कमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे सुलभ होणार असून, अपघातांवर नियंत्रण ठेवणे तसेच गुन्ह्यांचा छडा लावणे अधिक प्रभावी ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव पोलीस ठाण्यात आ. शशिकांत शिंदेंचे ठिय्या आंदोलन; चौकशीच्या आश्वासनानंतर माघार
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीची दखल

संबंधित बातम्या