सातारा : बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कुप्रथा अशा वाईट गोष्टीचे दुष्परिणाम आणि त्यांचे उच्चाटन करण्याचे मार्ग या संदर्भास अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅली आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचेमार्फत बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कू-प्रथांचे दुष्परिणाम आणि त्यांचे उच्चाटन करण्याचे मार्ग या संदर्भास अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅलीचे आयोजन दि १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सातारा शहरामधून करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्री-भ्रूणहत्या या कुप्रथांचे निर्मूलन करण्यासाठी आण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सातारा येथील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद शं. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. निना. नि. बेदरकर, सर्व न्यायिक अधिकारी, महिला व बालविकास कार्यालय, सातारा येथील अधिकारी व शिवाजी मलदोडे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), आण्णासाहेब कल्याणी विदयालय, सातारा येथील मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी, महाराजा सयाजीराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, सातारा, येथील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सदर रॅली जिल्हा न्यायालय, सातारा येथून आर. टी. ओ. रोड सिव्हिल हॉस्पीटल पोवईनाका यामार्गे काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद तसेच स्त्री-भ्रूण हत्या विषयीच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना रॅलीदरम्यान अल्पोपहाराची व्यवस्था विधी सेवा प्राधिकरण, सातारा या कार्यालयामार्फत करण्यात आली होती. रॅली सोबत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुक शाखेमार्फत वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका व वैद्यकीय अधिकारी यांचाही समावेश होता.