भैरवनाथ यात्रेनिमित्त परवानगी नाकारूनही लिंब येथे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम; आयोजकांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा : तालुक्यातील  लिंब येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारूनही पार पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी आयोजक सर्जेराव दिनकरराव सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आयोजक  सांवत यांनी कार्यक्रमासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. मात्र, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६८ अन्वये नोटीस देत तालुका पोलीस प्रशासनाने कार्यक्रमास परवानगी नाकारली होती.

तरी देखील २४ मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार महेंद्र माणिक नारनवर व सहकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले यावेळी कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले.पोलीसांनी आयोजकांना कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या, तसेच परवानगी नसल्याची जाणीव करून दिली. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करत कार्यक्रम रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला.

या प्रकारामुळे अधिकृत आदेशाचा भंग झाल्याने आयोजक सर्जेराव सांवत व इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम २२३ तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत ४ एप्रिलला पुन्हा होणार 'राडा' ?
पुढील बातमी
साताऱ्यात रामनवमी पारंपारिक उत्साहात; राम जन्म काळासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

संबंधित बातम्या