सातारा : पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पश्चिम खटाव परिसरातील शेतकऱ्यांच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नाला आता प्रत्यक्ष बळ मिळणार आहे. गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत नेर थेट गुरुत्वीय नलिका जलसिंचन योजनेच्या माध्यमातून १२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. येत्या ११ महिन्यात ही योजना पूर्ण करून दरजाई तलावात पाणी आणणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
दरजाई तलाव येथे नेर थेट गुरुत्वीय नलिका जलसिंचन योजनेचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार महेश शिंदे यांनी या योजनेचे महत्त्व विशद केले.
भूमिपूजन समारंभास जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, हणमंतराव बोटे, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शेडगे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ वलेकर, मनोहर लावंड, रोहित लावंड, शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटकर, बाजार समितीचे माजी सभापती अण्णा वलेकर, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रणधीरशेठ जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभ्यराजे घाटगे, विवेक देशमुख, तात्या लावंड, अंकुश पवार, संतोष बोटे, प्रेमचंद जगताप, पोपटराव भराडे, बबनराव घाडगे, अर्जुनराव गायकवाड, गणेश देशमुख, हरिश्चंद्र सावंत, नवनाथ लावंड, तानाजी पाटोळे, संगीताताई शिंदे, नितीन यादव, पांडूशेठ जगताप, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, विविध मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार शिंदे पुढे म्हणाले, दरजाई तलावात येत्या ११ महिन्यांत पाणी आणण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर धारपुडी, दरूज यासारख्या मोठ्या गावांसह परिसरातील गावांना कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान बदलण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना सोळशी धरणाच्या कामाला गती देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. या धरणासाठी पर्यावरणविषयक मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली. सध्या या धरणाची प्रस्तावित क्षमता ५.६३ टीएमसी असून, भविष्यात ती नऊ टीएमसीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. कण्हेर धरण आणि धोम धरण यांचा समन्वय साधून या प्रकल्पाचा उपयोग दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी करता येईल. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना न्याय देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असेही आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी डॉ. प्रियाताई शिंदे, विवेक देशमुख, शशिकांत रोमन, मनोहर लावंड यांनी मनोगत व्यक्त केले. दरूजचे उपसरपंच रोहित लावंड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲड. खामकर यांनी आभार मानले.
खटाव तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळमुक्तीचा मार्ग मोकळा; ११ महिन्यात नेर गुरुत्वीय सिंचन योजना पूर्ण करणार - आ. महेश शिंदे
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा