कुरघोड्या बंद करा शहराच्या विकासावर लक्ष द्या - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरसेवकांना कानपिचक्या

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा  : सातारा नगरपालिकेत सातारकरांनी आपल्याला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. आपले सर्व लक्ष आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यावर असावे. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा एकजुटीने काम करूया, असे परखड बोल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी सुनावले.

सातारा नगरपालिकेची मंगळवार दि. ७ रोजी सर्वसाधारण सभा होत आहे.  या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक येथील छत्रपती शिवाजी सभागृहात पार पडली या सभागृहातील बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले,  पूर्वी आपण विरोधात होतो आपल्या आघाड्या होत्या. हे मान्य मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मी असो किंवा खासदार उदयनराजे आम्ही दोघेही भारतीय जनता पक्षामधून निवडून आलो आहोत.  त्यामुळे नगरसेवकांनी एकमेकांच्या कुरघोड्या बंद करून वेळ वाया न घालवता शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे. नगरसेवकांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सभापतींना विश्वासात घेऊन आपली कामे मार्गी लावावी असे त्यांनी सांगितले. 

राजवाडा परिसरातील विक्रेत्यांचे पुनर्वसन करणार

कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारतीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांचा शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार समाचार घेतला. या इमारतीत मद्यपींचा वावर, अवैध प्रकार वाढले होते.  त्यामुळे ती पाडण्याचा ठराव आधीच झाला होता.  या जागेचा वापर राजवाडा परिसरातील हातगाडी धारकांच्या पुनर्वसनासाठी केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

सोनगाव कचरा डेपोतील आगीच्या घटनेवर संताप व्यक्त करत  शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हा विषय अत्यंत गंभीर आहे वेळेत माहिती दिली असती तर आग आटोक्यात आली असती हलगर्जीपणामुळे आरोग्य निरीक्षक आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी तिथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावात पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह खाजगी इसम कालेकर १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद
पुढील बातमी
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात थापल्या चुलीवर भाकऱ्या; जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचे निषेध आंदोलन

संबंधित बातम्या