जलसंपदा सह ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते आज राणंद तलावात जलपूजन

by Team Satara Today | published on : 15 May 2025


खटाव : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेंतर्गत आंधळी उपसा सिंचन योजनेद्वारे ग्रॅव्हिटीने पहिल्यांदाच राणंद तलावात आलेल्या पाण्याचे पूजन आज गुरुवारी दुपारी 3 वाजता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे माण - खटावच्या दुष्काळमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी ना. जयकुमार गोरे गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्नशील राहिले आहेत. बारा वर्षांपूर्वी उरमोडी योजनेचे पाणी मतदारसंघात आणून दुष्काळमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. तेव्हापासून उरमोडीचे पाणी मतदारसंघातील 90 पेक्षा अधिक गावांची तहान भागवण्याबरोबर बागायती शेतीचे स्वप्न साकारत आहे. माण आणि खटाव तालुक्यांसाठी वरदान ठरणार्‍या जिहे-कठापूर योजनेसाठी ना. गोरे यांनी आघाडी आणि युती सरकारच्या काळात शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करुन या योजनेची कामे मार्गी लावली. 

सुरुवातीला जिहे-कठापूरचे पाणी खटाव तालुक्यात आणि त्यानंतर गेल्या वर्षी हे पाणी माण तालुक्यात आणून दुष्काळमुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली. दरम्यानच्या काळात माण तालुक्याच्या उत्तर भागातील गावांसाठी आंधळी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मांडून त्यांनी विक्रमी वेळेत मंजुरी मिळवून ही योजना पूर्णत्वाला नेली आहे. आंधळी धरणातून कृष्णेचे पाणी पहिल्यांदाच राणंद तलावात पोहचवण्याचे उद्दिष्ट नुकतेच साध्य करण्यात आले आहे. 

आज गुरुवारी दुपारी 3 वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राणंद तलावात आलेल्या पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.राहुल कुल, आ. सचिन पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश सत्रे, प्रशांत गोरड, अनिल माळी, जलसंपदा तसेच कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी, भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मुस्लिम बांधवांतर्फे 'छत्रपती सन्‍मान ज्‍योत यात्रा'

संबंधित बातम्या