ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

by Team Satara Today | published on : 04 August 2026


कोल्हापूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार तथा त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.

कसबा बावडा येथील ‘ज्ञानशांती’ या निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या भूमीतून सुरू झालेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक साम्राज्य उभा करणारा एक महान ज्ञानाचा प्रवास थांबला असून संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

​डॉ. डी. वाय. पाटील यांनी अगदी तळागाळातून आपल्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून यशस्वी काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत पन्हाळा मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षातील प्रदीर्घ आणि निष्ठावंत सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर मार्च २०१३ मध्ये त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली, तसेच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी समर्थपणे सांभाळला.

​राजकीय वाटचालीच्या उत्तरार्धात २४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षात व्यतीत केलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांची सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध जपणारे दिलदार व्यक्तिमत्त्व अशी राजकीय वर्तुळात वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा; २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

संबंधित बातम्या