वडीगोद्री ( जालना) : "आतापर्यंत आम्ही सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून भरपूर वेळ दिला. मात्र, आता आम्हाला केवळ 'सकारात्मक चर्चा' किंवा तोंडी आश्वासने नको आहेत, तर प्रत्येक मागणीचे ठोस लेखी आश्वासन द्या. जर सरकार आज रात्रीपर्यंत लेखी निर्णय देणार नसेल, तर शनिवार, ३० मे रोजी सकाळी ठीक १० वाजता मी माझ्या ठरलेल्या नियोजनानुसार रखरखत्या उन्हात बाज टाकून सर्वात कठोर आमरण उपोषणावर बसणारच, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या हायव्होल्टेज बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आरपारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात मध्यरात्री खलबतं; रात्री किंवा सकाळी पुन्हा शिष्टमंडळ?
बैठकीतील इनसाईड माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, "मंत्री विखे पाटलांनी प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई करणाऱ्या सुस्त अधिकाऱ्यांना माझ्यासमोर कडक शब्दांत खडसावले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून अंतिम मसुदा आम्हाला कळवला जाईल, असे विखे पाटलांनी सांगितले आहे. त्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी सरकारचे प्रतिनिधी अंतिम लेखी प्रस्ताव घेऊन पुन्हा चर्चेसाठी येऊ शकतात."
गंभीर असता तर आतापर्यंत लेखी दिले असते
सरकारच्या वेळकाढूपणावर तोफ डागताना जरांगे म्हणाले, "आम्ही सरकारला प्रत्येक टप्प्यावर पुरेसा आणि सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र सरकारकडून कधीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जर सरकार खरोखरच मराठ्यांच्या आरक्षणाबाबत गंभीर असते, तर आतापर्यंत आमच्या हातात लेखी आदेश पडले असते. आता लेखी निर्णयाशिवाय कोणतीही माघार घेतली जाणार नाही."
आंदोलन सुरू झाले तरी विखे-लाडांचा सन्मानच राहील
राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीवर बोलताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. "आम्ही विखे पाटील आणि लाड यांच्यावर विश्वास ठेवला आहे. उद्या सकाळी १० वाजता माझे आंदोलन सुरू झाल्यानंतरही ते जर सरकारचा कोणताही सकारात्मक लेखी निर्णय घेऊन चर्चेसाठी आले, तर आंदोलक म्हणून त्यांचा सन्मानच राखला जाईल. आम्ही आजही चर्चेसाठी सकारात्मक आहोत, आता सरकारने आपली भूमिका सिद्ध करावी."
आंदोलन अत्यंत कठोर स्वरूपाचे असेल
उद्याचे आंदोलन अत्यंत कठोर स्वरूपाचे असेल, मी भर उन्हात बाज टाकून अन्न-पाण्याविना बसणार आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. मात्र, मे महिन्यातील वाढता उष्माघात आणि भीषण उन्हाची लाट लक्षात घेता मराठा समाजातील बांधवांनी, वृद्ध आणि बालकांनी अंतरवाली सराटीत उन्हात मोठ्या संख्येने गर्दी करू नये, असे भावुक आवाहनही त्यांनी शेवटी केले.