नागपूर : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे माझे बारकाईने लक्ष असून, आजच्या बैठकीत सरकारकडून यावर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तसे झाले नाही, तर पुढच्या महिन्यात मोठे आंदोलन करू आणि त्या आंदोलनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही बोलावले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला.
पुण्यात पार पडलेल्या संवाद कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत आणि त्यांच्या मागण्यांविषयी राहुल गांधी यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यावर राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेत, 'मलाही तिथे बोलवा, मी तुमच्यासोबत येऊन बसतो,' असे म्हणत आंदोलनाला सहमती दर्शवली होती. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे.
सोमवारी आ. रोहित पवार यांनी कळमना येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात 'विदर्भ व नागपूर आदिवासी विद्यार्थी संघा'च्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आ. रोहित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर माझे बारीक लक्ष आहे. मागण्या तातडीने सुटल्या नाहीत, तर मोठे आंदोलन होईल. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या लढ्यात आपण पूर्ण ताकदीने उतरू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सुनील भुसारा, रविकांत वरपे, दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोले, रविकांत बोपचे यांच्यासह आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश एस. इरपाची, मोहित पंधरे, आंचल परतेती, सागर गांगुर्डे, शेखर कोराम, दीपक पंधरे, मैना सलामे, सुरज तेलामी, लोकेश नामुर्ते, विलास धुर्वे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.