वारस नोंदीसाठी लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी रंगेहाथ अटकेत; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा :  वारस हक्काची नोंद करून देण्यासाठी २,५०० रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी अर्चना रामचंद्र गावडे (वय ४०) यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कराड तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावावरील चचेगाव येथील जमिनीच्या वारस नोंदीसाठी तक्रारदाराच्या वडिलांनी २९ जानेवारी २०२६ रोजी अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा तक्रारदार करत होते. दरम्यान, वारस नोंद मंजूर करून सातबाऱ्यावर तक्रारदाराच्या वडिलांचे व चुलत्यांचे नाव नोंदविण्याचे काम केल्याच्या मोबदल्यात ग्राम महसूल अधिकारी अर्चना गावडे यांनी २,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २ जून रोजी एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी २ व ३ जून रोजी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान अर्चना गावडे यांनी पंचांसमक्ष २,५०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी सापळा कारवाईचे नेतृत्व केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने काम करणारी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पूर्ववैमनस्यातून दोघांना कारने चिरडण्याचा प्रयत्न; आगाशिवनगर येथील धक्कादायक प्रकार
पुढील बातमी
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'आपले सरकार सेवा केंद्र' येत्या तीन महिन्यांत सुरू करा; सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश

संबंधित बातम्या