सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत ५ कोटी ९२ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या निधीतून पाडेगाव, तरडगाव, बरड तसेच लोणंद परिसरात वारकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या निधी मंजुरीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेत सातारा जिल्ह्याच्या मागणीस प्राधान्य दिल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले.
आषाढीवारी दरम्यान लाखो वारकरी सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असतात. वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या विकासकामांमुळे वारकऱ्यांना स्वच्छता, निवास, स्नान, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, सुरक्षित रस्ते व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार असून पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सक्षम व सुव्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासन, बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ही कामे दर्जेदार व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.